गुकेशचा कारुआनावर विजय, एरिगेसी कार्लसनविरुद्ध पराभूत
वृत्तसंस्था/ स्टॅव्हेंजर (नॉर्वे)
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या खुल्या प्रकारात भारतीयांसाठी कालचा दिवस संमिश्र राहून अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाविरुद्धच्या रोमांचक आर्मागेडन टायब्रेकमध्ये विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश विजेता ठरला, तर अर्जुन एरिगेसीला मॅग्नस कार्लसनच्या कौशल्यापुढे हार मानावी लागली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काऊआनाला गुऊवारी 19 वर्षे पूर्ण केलेल्या त्याच्या भारतीय प्रतिस्पर्ध्याविऊद्ध चौथ्या फेरीच्या सामन्यात बहुतेक वेळा प्याद्यांचा फायदा मिळाला, परंतु हा अमेरिकन खेळाडू गुकेशच्या उत्कृष्ट बचावात्मक कौशल्यामुळे चार तासांहून अधिक काळ चाललेल्या लढतीत त्याचे महत्त्वपूर्ण आघाडीत रूपांतर करू शकला नाही. कोंडी फोडण्यासाठी आर्मागेडन टायब्रेकचा वापर करण्यात आला.
गुकेश आणि एरिगेसी हे दोघेही आता प्रत्येकी 4.5 गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत, तर कार्लसन 8 गुणांसह एकमेव आघाडीवर आहे. त्यानंतर काऊआना 7 गुण आणि अमेरिकन ग्रँडमास्टर हिकारू नाकामुरा 5.5 गुणांसह विसावलेला आहे. गुकेश पांढऱ्या सेंगाट्यांसह खेळला आणि आर्मागेडनमध्ये तीन मिनिटांचा मोठा फायदा त्याला मिळाला. कारण आर्मागेडनमध्ये पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला आणि काळ्या सोंगाट्या घेऊन खेळणाऱ्या खेळाडूला सात मिनिटे मिळतात. क्लासिकल चेस लढतीतील कठीण परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर 15 मिनिटांपेक्षा कमी वेळेत भारतीय खेळाडूने काऊआनाला वेळेच्या बाबतीत हरवून गेममधून 1.5 गुण मिळवले.
गुकेश नंतर म्हणाला की, त्याला त्याच्या वाढदिनी खेळायला खरोखर आवडत नाही, परंतु हा महत्त्वाचा मनोबल वाढवणारा विजय तो आनंदाने स्वीकारेल. गुकेश सामन्याच्या सुऊवातीलाच अतिशय कठीण स्थितीत सापडला होता. परंतु गुकेशने कठीण परिस्थितीतून बाहेर पडताना आणि आर्मागेडन टायब्रेकमध्ये सामना जिंकताना आपला तोल राखला. महत्त्वाचे म्हणजे आर्मागेडन हे त्याचे बलस्थान नाही.
दुसरीकडे, जागतिक अव्वल क्रमांकावरील कार्लसनने सामन्याच्या शेवटच्या टप्प्याच्या खेळातील आपली रणनीतिक श्रेष्ठता दाखवली. भारताचा दुसऱ्या क्रमांकावरील खेळाडू एरिगेसी त्यात काळ्या सोंगाट्यांसह खेळला. गेल्या दोन फेऱ्यांमध्ये दोन आर्मागेडन गेम गमावलेल्या नॉर्वेजियन सुपरस्टारने या विजयासह एक मजबूत विधान केले आहे. तिसऱ्या फेरीत काऊआनाविऊद्ध पराभव पत्करल्यानंतर एरिगेईसीसाठी हा दोन दिवसांतील दुसरा धक्का होता.
महिला विभागात भारताच्या आर. वैशालीने आर्मागेडन टायब्रेकमध्ये युक्रेनच्या अॅना मुझीचुकवर मात करून महत्त्वपूर्ण अर्धा गुण मिळवला, तर विश्वविजेत्या वेनजून जूने क्लासिकल गेम अनिर्णित राहिल्यानंतर वेळेच्या नियंत्रणाखाली कोनेरू हम्पीचा पराभव केला. तरीही हम्पी मुझीचूकसह सात गुण घेऊन आघाडीवर असून वैशाली 3.5 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.