गुकेशचा सामना आज वेई यीशी
वृत्तसंस्था/ विज्क अॅन झी, नेदरलँड्स
कमी आघाडीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेला विश्वविजेता डी. गुकेश टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या आज शनिवारी होणार असलेल्या 11 व्या फेरीत चीनच्या वेई यीचा सामना करेल. यावेळी गुकेशचा उद्देश त्याची अपराजित मालिका कायम ठेवणे आणि हंगामातील पहिले विजेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने आणखी एक ठोस पाऊल घालणे हा असेल.
पाच विजय आणि पाच बरोबरींसह गुकेश वर्षाच्या या पहिल्या मोठ्या स्पर्धेत अपराजित राहिला आहे आणि जर त्याने शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये आणखी 1.5 गुण जोडले, तर ते विजेतेपद जिंकण्यासस पुरेसे ठरेल. 7.5 गुणांसह गुकेश अग्रस्थानावर असून उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हपेक्षा अर्ध्या गुणाने आणि त्याचा सहकारी आर. प्रज्ञानंदपेक्षा पूर्ण एका गुणाने पुढे आहे. शेवटच्या तीनपैकी दोन सामने गुकेश पांढऱ्या सेंगाट्या घेऊन खेळणार असून 12 व्या फेरीत हॉलंडच्या जॉर्डन व्हॅन फॉरेस्टशी, तर शेवटी सुरात नसलेल्या अर्जुन एरिगेसीशी त्याचा सामना होईल.
अब्दुसत्तोरोव्ह आणि प्रज्ञानंद या दोघांचेही काळ्या सोंगाट्या घेऊन खेळण्याचे दोन सामने शिल्लक आहेत. यामुळे गुकेशचे पारडे येथे जेतेपद जिंकण्याच्या दृष्टीने थोडे भारी झाले आहे. मात्र हे लक्षात ठेवावे लागेल की, गेल्या वर्षी भारतीय खेळाडू अव्वल स्थानावर बरोबरी झाल्यानंतर वेई यीविऊद्ध टायब्रेकरमध्ये पराभूत झाला होता. येथे केवळ विजयच महत्त्वाचा नाही, तर गुकेशसाठी 2800 रेटिंग पार करण्याचा देखील प्रश्न असून जर ते शक्य झाले, तर तो विश्वनाथन आनंद आणि अर्जुननंतर तशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरेल. लाईव्ह रेटिंगमध्ये तो सध्या 2794 गुणांवर आहे. दुसरीकडे, 11 व्या फेरीतील इतर महत्त्वाच्या लढतींमध्ये प्रज्ञानंदचा सामना अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाशी, तर अब्दुसत्तोरोव्हचा जर्मनीच्या विन्सेंट कीमरशी होईल.
उझ्बेक ग्रँडमास्टरने मागितली वैशालीची माफी
उझबेक ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबबोएव्हने टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत धार्मिक कारणांमुळे सामन्यापूर्वी भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीशी हस्तांदोलन करण्यास नकार देऊन खळबळ उडवून दिली होती. मात्र त्याने आता वैशालीला फुले, चॉकलेट देण्याबरोबर तिची माफी मागितली आहे. याकुबबोएव्हने चालू स्पर्धेदरम्यान वैशालीची भेट घेतली. यावेळी तिचा धाकटा भाऊ ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आणि आई नागलक्ष्मी सोबत होती. 23 वर्षीय याकुबबोएव्हने यावेळी पुन्हा सांगितले की, त्याच्या कृत्यामुळे जी अनावश्यक परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल त्याला पश्चात्ताप वाटतो.