For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेश घसरून दुसऱ्या स्थानावर, प्रज्ञानंद - गुजराथी पराभूत

06:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेश घसरून दुसऱ्या स्थानावर  प्रज्ञानंद   गुजराथी पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था /टॉरंटो

Advertisement

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 11 व्या फेरीत ग्रँडमास्टर डी. गुकेश याने अव्वल मानांकित फॅबियानो काऊआनाविऊद्धची लढत बरोबरीत सोडविण्यात यश मिळविले असले, तरी या निकालामुळे तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. या दिवशी दोन अन्य भारतीय खेळाडूंना मात्र निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले. या फेरीत दबावाला खेळाडू कसे तोंड देतात हे महत्त्वाचे ठरून आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी यांना अनुक्रमे अमेरिकन हिकारू नाकामुरा आणि रशियन इयान नेपोम्नियाची यांच्याविऊद्ध पराभव स्वीकारावा लागला. पण 17 वर्षीय गुकेशने काऊआनाविऊद्ध स्वत:ची पकड ढिली पडू दिली नाही. अन्य सामन्यांत फ्रान्सचा फिरोझा अलीरेझा अझरबैजानच्या निजात आबासोव्हपेक्षा वरचढ ठरला. फक्त तीन फेऱ्या बाकी असताना नेपोम्नियाचीचे पारडे भारी झाले आहे. तो त्याच्या सलग तिसऱ्या कँडिडेट्स विजेतेपदासाठी प्रयत्न करत आहे. रशियाच्या आंतरराष्ट्रीय निलंबनामुळे त्याला येथे ‘फिडे’च्या ध्वजाखाली सहभागी व्हावे लागले आहे. तो 7 गुणांसह एकटाच आघाडीवर असून इतर स्पर्धकांना त्याच्या पुढे जाणे कठीण होईल असे वाटत आहे.

काऊआना, नाकामुरा आणि गुकेश हे त्याच्यापेक्षा अर्ध्या गुणाने मागे आहेत. प्रज्ञानंद आणि गुजराथी यांची अनुक्रमे 5.5 आणि 5 गुणांसह घसरण झाली आहे. अलीरेझाने मात्र पिछडीवरून उसळी घेतलेली असून आबासोव्हला त्याचे आव्हान पेलता आले नाही. महिलांच्या गटात चीनचे वर्चस्व कायम राहिले आहे. कारण झोंगयी टॅनने रशियाच्या कॅटेरिना लागनोवर मात करून पुन्हा एकट्यानेच आघाडी मिळविली आहे. युक्रेनच्या अॅना मुझीचूकसोबत बरोबरी साधणाऱ्या आपल्याच देशाच्या टिंगजी लेईला तिने मागे टाकले आहे. आर. वैशालीने जरा उशिरा का होईना अव्वल मानांकित रशियन खेळाडू अॅलेक्झांड्रा गोर्याचकिना हिला पराभूत केले, तर कोनेरू हम्पीने बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हाकडून आरंभी झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

Advertisement

Advertisement
Tags :

.