For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेश-नेपोम्नियाची लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम

06:45 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेश नेपोम्नियाची लढत बरोबरीत  संयुक्त आघाडी कायम
Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने येथे चालू असलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 10 व्या फेरीत रशियन इयान नेपोम्नियाचीबरोबरच सामना बरोबरीत सोडवत त्याच्यासह संयुक्त अव्वल स्थान राखले आहे. आर. प्रज्ञानंद व विदित गुजराथी यांच्यातील लढत बरोबरीत संपली, तर फॅबियानो काऊआना आणि हिकारू नाकामुरा यांनी अनुक्रमे फिरोझा अलीरेझा आणि निजात आबासोव्ह यांना पराभूत केले. यामुळे ते आघाडीवर असलेल्या दोन्ही बुद्धिबळपटूंच्या जवळ पोहोचले आहेत.

वर्षातील या सर्वांत मोठ्या स्पर्धेत फक्त चार फेऱ्या बाकी असताना गुकेश आणि नेपोम्नियाची यांचे प्रत्येकी सहा गुण झाले आहेत आणि प्रज्ञानंद, काऊआना व नाकामुरा अर्ध्या गुणाने मागे आहेत. गुजराथी पाच गुणांसह एकटाच सहाव्या स्थानावर आहे, तर अलीरेझा आणि आबासोव्ह अनुक्रमे 3.5 आणि 2 गुणांसह शर्यतीतून बाहेर पडले आहेत. नेपोम्नियाचीने या स्पर्धेत कोणत्याही रंगाच्या सोंगाट्या वाट्याला आल्या, तरी जास्त जोखीम घेतलेली नाही आणि त्याच्या भक्कम खेळामुळे तो 10 फेऱ्यांनंतर अपराजित राहिलेला एकमेव खेळाडू बनला आहे.

Advertisement

ऊई लोपेझ पद्धतीने सुरुवात केलेल्या नेपोम्नियाचीला तोंड देताना 17 वर्षीय गुकेशने काही वेळेनंतर समान स्थिती सुनिश्चित केली. सुरुवात आणि अखेरचा खेळ वगळता या सामन्यात फारसे रंजक असे काही घडले नाही. गुकेशविऊद्ध दुसऱ्या फेरीत एकमेव पराभव पत्करावा लागलेल्या प्रज्ञानंदनेही चांगली कामगिरी केली. या 18 वर्षीय तऊणाने गुजराथीच्या बर्लिन बचावाचा सामना केला. 39 चालींनंतर सामना बरोबरीत सुटला.

महिला विभागात चीनच्या टिनजी लेईने रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिना हिची अपराजित वाटचाल संपुष्टात आणली आणि चीनच्या झोंगयी टॅनसह संयुक्त आघाडी पुन्हा मिळवली. झोंगयीची कोनेरू हम्पीसोबतची लढत बरोबरीत संपली. लागोपाठ पराभव स्वीकारल्यानंतर आर. वैशालीने बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हासमवेतच्या लढतीत उसळी घेत विजय नोंदविला, तर रशियाच्या कॅटेरिना लागनोने युक्रेनच्या अॅना मुझिचूकसोबतची लढत बरोबरीत सोडविली. प्रत्येकी 6.5 गुणांसह लेई आणि टॅन या चिनी जोडीने गोर्याचकिना आणि लागनो यांच्यावर पूर्ण गुणाची आघाडी घेतली आहे. हम्पी 4.5 गुणांसह पाचव्या स्थानावर आणि सलीमोव्हा, मुझीचूक यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे. विजय मिळवूनही वैशाली 3.5 गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे.

Advertisement
Tags :

.