गुकेश - लिरेन 13 वा सामना बरोबरीत, आजची लढत निर्णायक
पुन्हा बरोबरी झाल्यास लढत टायब्रेकरमध्ये जाईल
वृत्तसंस्था/ सिंगापूर
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील डी. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यातील 13 वा सामनाही बरोबरीत संपला आहे. यामुळे निर्धारित सामन्यांपैकी अखेरच्या 14 व्या फेरीतील आज गुरुवारी होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो कुणी जिंकले तो जागतिक विजेतेपद पटकावून जाईल आणि आजचा सामनाही बरोबरीत सुटला, तर लढत टायब्रेकरवर जाईल. मात्र आजच्या सामन्यात लिरेनला पांढऱ्या सोंगाट्यानिशी खेळण्याची अनुकूलता लाभणार आहे.
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची एक फेरी शिल्लक राहिलेली असताना अनिर्णीत राहिलेल्या 13 व्या सामन्याने गुकेश आणि लिरेनला प्रत्येकी 6.5 गुणांच्या समान पातळीवर आणून सोडले आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी त्यांना एका गुणाची गरज आहे. दोन्ही खेळाडूंनी 69 चालीनंतर बरोबरी मान्य केली. 32 वर्षीय लिरेनने सुऊवातीचा सामना जिंकला होता, तर 18 वर्षीय गुकेशने तिसऱ्या गेममध्ये विजय मिळवून बरोबरी साधली होती.
त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सचे सलग सात सामने बरोबरीत सुटले होते आणि गुकेशने 11 व्या सामन्यात 6-5 अशी आघाडी घेतली होती, परंतु लिरेनने 12 व्या सामन्यात विजय मिळवून भारतीय खेळाडूला धक्का दिला होता. बुधवारी गुकेश पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळला होता.