For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अलीरेझाला नमवून गुकेश आघाडीवर

06:28 AM Apr 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अलीरेझाला नमवून गुकेश आघाडीवर
Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश येथे चालू असलेल्या कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 13 व्या आणि उपांत्य फेरीत फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझाला पराभूत करून एकट्याने आघाडीवर पोहोचला आहे आणि जगज्जेत्याचा सर्वांत तरुण आव्हानवीर बनण्याच्या उंबरठ्यावर तो पोहोचलेला आहे. चेन्नईच्या या 17 वर्षीय खेळाडूने जर कँडिडेट्स स्पर्धा जिंकली, तर तो जागतिक विजेतेपदासाठीच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनशी लढेल.

महिलांच्या विभागात कोनेरू हम्पीने अॅना मुझीचूकसमवेत बरोबरीत साधली, तर वैशाली रमेशबाबूने लेई टिंगजी हिच्यावर मात करण्यात यश मिळविले. 22 वर्षीय वैशालीने मागील चार लढतींत सलग चार विजय नोंदवले आहेत. पुरुषांच्या गटात रशियन इयान नेपोम्नियाची आणि अमेरिकन हिकारू नाकामुरा यांचा सामना बरोबरीत संपल्यानंतर आघाडी मिळविण्यासाठी विजयाची गरज असलेल्या गुकेशने ही संधी सोडली नाही. अलीरेझाने उशिरा केलेल्या चुकीचा त्याने व्यवस्थित फायदा घेतला. 8.5 गुण मिळवून गुकेश नेपोम्नियाची, नाकामुरा आणि अमेरिकेचा फॅबियानो काऊआना यांच्यापेक्षा अर्ध्या गुणाने पुढे आहे.

Advertisement

आर. प्रज्ञानंद आणि विदित गुजराथी सहा गुणांसह पाचव्या स्थानावर असून फिरोजाचे 4.5 आणि आबासोव्हचे 3.5 गुण झाले आहेत. अन्य लढतींत काऊआनाने प्रज्ञानंदला पराभूत केले, तर गुजराथीला अझरबैजानच्या निजात आबासोव्हविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गुकेशची शेवटच्या फेरीच्या सामन्यात पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळणार असलेल्या नाकामुराशी गाठ पडेल. कारुआनाला नेपोम्नियाचीविऊद्ध लढावे लागणार आहे. वरील चार खेळाडूंपैकी कोणीही ही स्पर्धा जिंकू शकतो. असे असले, तरी गुकेशला जास्त संधी असून त्याला फक्त एक बरोबरीशी पुरेशी ठरेल, असे मानले जात आहे.

महिला विभागात चीनच्या झोंगयी टॅनने अव्वल मानांकित रशियन खेळाडू अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबत बरोबरी साधून जवळची प्रतिस्पर्धी असलेली चीनचीच खेळाडू टिंगजी लेईवर पूर्ण गुणाची आघाडी घेतली आहे.

Advertisement
Tags :

.