गुकेश संयुक्त दुसरा, वेई यि विजेता
स्टील मास्टर्स बुद्धिबळ : चॅलेंजर विभागात गोव्याचा मेन्डोन्सा विजेता
वृत्तसंस्था/ विज्क आन झी, नेदरलँड्स
भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश चीनच्या वेई यिविरुद्धच्या शेवटच्या टायब्रेकर लढतीत धक्का बसल्याने त्याला टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर लिऑन ल्युक मेन्डोन्साने चॅलेंजर विभागाचे जेतेपद पटकावताना 13 व शेवटच्या फेरीत आपल्याच देशाच्या दिव्या देशमुखचा पराभव केला.
गुकेशसाठी शेवटचा पूर्ण दिवस खूप मेहनतीचा ठरला. त्याला 13 व्या फेरीत इराणच्या परहान मघसूदलूविरुद्ध काळ्या मोहरांनी खेळत विजय मिळवणे आवश्यक होते आणि त्यानंतर तीन सुपर टायब्रेकमध्ये गतविजेत्या अनिश गिरीवर विजय मिळवित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवायची होती. त्याने हा हेतू साध्य करीत अंतिम फेरी गाठलीदेखील. पण वेई यिने त्याला पहिल्या डावात बरोबरीत रोखल्यानंतर दुसरा डाव जिंकून गुकेशच्या आशेवर पाणी फेरले.
मेन्डोन्सा विजेता
गुकेशचा हार्टब्रेक झाला असला तरी चॅलेंजर विभागात मेन्डोन्साने भारताला यश मिळवून देताना जेतेपद पटकावले. मेन्डोन्साने अंतिम फेरीत दिव्या देशमुखचा पराभव केला. अतिशय गुंतागुंतीच्या या डावात दोघांनाही विजयाची संधी होती. पण दिव्याकडून प्रथम चूक झाली. डावाच्या मध्यावर तिने चुकीची मोहरा उचलली आणि त्याचा लाभ मेन्डोन्साने घेतला. ‘मी खूप आनंदी व समाधानी झालो. कारण संपूर्ण स्पर्धेत मला जेतेपदाची संधी असल्याचे स्पष्टच झाले नव्हते. शेवटच्या फेरीआधी मला संधी असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय मला यशासाठी सुदैवाचीही गरज होती. पण अखेर मनासारखे झाले, याचे समाधान वाटले,’ असे मेन्डोन्सा म्हणाला.
या स्पर्धेच्या पूर्वार्धात मेन्डोसाने 6 पैकी 3 गुण मिळविले आणि उत्तरार्धात 7 पैकी 6.5 गुण मिळवित जेतेपद मिळविले. त्याने 13 पैकी 9.5 गुण मिळविले. 2025 मध्ये होणाऱ्या मास्टर्स विभागात खेळण्यासही तो पात्र ठरला आहे. गोव्याच्या या खेळाडूला हा मोठा ब्रेकथ्रू मिळाला असल्याचे मानले जात आहे. कोविडच्या काळात तो युरोपमध्ये अडकला होता. यानंतर तो ग्रँडमास्टर बनला होता.
मास्टर्स विभागातील 13 व्या फेरीत गुकेशने काळ्या मोहरांनी खेळताना किचकट डावात मघसूदलूला हरविले. विदित गुजरातीला वेई यिने हरवून अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीतील पहिल्या डावात गुकेशला पांढऱ्या मोहरांनी खेळताना गिरीकडून पराभव स्वीकारावा लागला. पण गुकेशने दुसरा गेम जिंकून बरोबरी साधली. वेईने नॉदिरबेक अब्दुसत्तारोव्हला 1.5-0.5 असे हरवून जेतेपदाच्या टायब्रेकमध्ये स्थान मिळविले होते. जेतेपदाच्या लढतीत वेई यिने गुकेशवर 1.5-0.5 अशा गुणांनी मात करीत मास्टर्स स्पर्धेतील पहिले जेतेपद पटकावले.