गुजरातचे लक्ष अव्वल दोन स्थानांवर
आज लखनौशी सामना
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
माजी विजेते गुजरात टायटन्स आज गुऊवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधील सामन्यात संघर्षरत लखनौ सुपर जायंट्सशी लढणार असून यावेळी विजयी मालिका वाढवून आघाडीच्या दोन संघांत स्थान मिळवण्याचा प्रयत्न गुजरातकडून केला जाईल.
12 सामन्यांमधून 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल असलेल्या टायटन्सने प्लेऑफमध्ये आधीच आपले स्थान निश्चित केले आहे. तथापि, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि पंजाब किंग्स हे 17 गुणांसह जवळ असल्याने आघाडीच्या दोन स्थानांसाठीची शर्यत अजूनही जिवंत आहे. गुजरातसाठी सर्व काही व्यवस्थित घडत गेले आहे. सध्याचा ऑरेंज कॅपधारक बी. साई सुदर्शन (617 धावा), कर्णधार शुभमन गिल (601) आणि जोस बटलर (500) ही त्यांची वरची फळी उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्यांनी संघाच्या बहुतेक विजयांचा पाया रचला आहे. एकत्रितपणे त्यांनी 16 अर्धशतके आणि एक शतक ठोकले आहे.
तथापि, अशा वरच्या फळीच्या वर्चस्वामुळे मधल्या फळीला बहुतेक वेळा कसोटीला सामोरे जावे लागले नाही. गुजरातची गोलंदाजीही तितकीच जबरदस्त राहिली आहे. त्यांच्या भारतीय वेगवान गोलंदाजांनी आघाडी घेतली असून प्रसिद्ध कृष्णा या हंगामात 21 बळी घेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद सिराज आणि डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर यांनी प्रत्येकी 15 बळी घेतले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा परतल्याने त्याच्या माऱ्यात आणखी भर पडली आहे. तो ‘रिक्रिएशनल ड्रग’च्या वापरामुळे निलंबित झाल्यानंतर बहुतेक हंगामात खेळू शकला नाही.
दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सच्या प्लेऑफच्या आशा सोमवारी सनरायझर्स हैदराबादविऊद्धच्या पराभवानंतर धुळीस मिळाल्या. रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ चार सामन्यांत पराभूत झालेला असून त्यांनी सातत्याचा अभाव आणि दुखापतींनी भरलेल्या मोहिमेचा सामना केला आहे. धावांसाठी एलएसजी त्यांच्या परदेशी खेळाडूंवर म्हणजे मिचेल मार्श, एडेन मार्करम आणि निकोलस पूरनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पंतकडून उल्लेखनीय योगदानाचा अभाव जाणवत आलेला असून त्याच्यासाठी हा हंगाम वाईट गेला आहे आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी त्यांच्या समस्या वाढवल्या आहेत.
प्रमुख गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळे त्यांची मोहीम आणखी खराब झाली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खान संपूर्ण हंगामात खेळू शकलेला नाही, तर वेगवान गोलंदाज मयंक यादव, ज्याला मोठ्या आशेने संघात ठेवण्यात आले होते, त्याने बहुतेक वेळ बाहेरच घालवलेला आहे. आवेश खान आणि आकाश दीप यांनाही तंदुऊस्तीच्या समस्यांचा सामना करावा लागला आहे, ज्यामुळे एलएसजीच्या माऱ्याची तीव्रता खूप कमी झाली आहे. पंतने या खेळाडूंच्या अनुपस्थितींचा संघावर झालेला विपरित परिणाम मान्य केला आहे.
हे कमी म्हणून की काय या मोसमातील एलएसजीच्या सर्वांत यशस्वी गोलंदाजांपैकी एक फिरकीपटू दिग्वेश राठीविना त्यांना आज खेळावे लागेल. राठीने 8.18 च्या इकोनॉमी रेटने 14 बळी घेतलेले आहेत. मागील सामन्यात अभिषेक शर्मासोबत मैदानावर झालेल्या भांडणामुळे त्याला एका सामन्याच्या निलंबनाची शिक्षा झालेली आहे. यामुळे संघाच्या आधीच ढिसाळ मोहिमेला आणखी धक्का बसला आहे.
संघ : गुजरात टायटन्स-शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, निशांत सिद्धू, महिपाल लोमरोर, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद अर्शद खान, आर. साई किशोर, जयंत यादव, करीम जनात, बी. साई सुदर्शन, दासून शनाका, शाहऊख खान, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुतार, जेराल्ड कोएत्झी, गुरनूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, कुलवंत खेजरोलिया, राहुल तेवतिया, रशिद खान.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रेट्झके, हिम्मत सिंग, शमर जोसेफ, मणिमारन सिद्धार्थ, आर्यन जुयाल, आर. एस. हंगरगेकर, युवराज चौधरी, आकाश महाराज सिंग, अर्शिन कुलकर्णी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.