अमेरिकेत गुजरातच्या वडील-मुलीची हत्या
शॉप उघडताच दोघांवर गोळीबार : सात वर्षांपूर्वी कुटुंबाचे अमेरिकेत स्थलांतर
वृत्तसंस्था/ व्हर्जिनिया
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका भारतीय वंशाच्या वडील आणि मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मृत प्रदीप पटेल (56) आणि त्यांची मुलगी उर्वी (24) एका दुकानात काम करत होते. सकाळच्या सुमारास प्रदीप आणि उर्वी यांनी दुकान उघडताच दोघांवर गोळीबार करून हल्लेखोर फरार झाला. या हल्ल्यात प्रदीपचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या अवघ्या दोन तासांनंतर पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली. गोळीबाराच्या घटनेपूर्वी हल्लेखोर रात्रभर दुकानाबाहेर बसला होता. सकाळी दुकान उघडताच तो आत शिरला आणि दोघांवर गोळीबार केला, असे पोलिसांनी सांगितले. हत्येतील आरोपीचे नाव जॉर्ज फ्रेझियर असे आहे. तो रात्री मद्य खरेदी करण्यासाठी आला होता, पण दुकान बंद होते. रात्री दुकान का उघडले नाही याचा त्याला राग आला. म्हणूनच तो रात्रभर दुकानाबाहेर बसला आणि सकाळी दोघांनाही गोळ्या घातल्या, असे चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना सांगितले.
मृत प्रदीप पटेल हे मूळचे गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील कानोडा गावचे रहिवासी होते. येथे ते इलेक्ट्रॉनिक दुकान चालवत होते. ते 7 वर्षांपूर्वी पत्नी हंसाबेन आणि मुलगी उर्वीसह अमेरिकेत स्थायिक झाले होते.