गुजरात -राजस्थान यांच्यात आज लढत
वृत्तसंस्था/ जयपूर
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज सोमवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करताना जोरदार फॉर्ममध्ये असलेले गुजरात टायटन्स अव्वल स्थानावरील आपली पकड मजबूत करून प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतील. आठ सामन्यांतील सहा विजयांसह 10 संघांच्या गुणतालिकेत आरामात अव्वल स्थानावर असलेल्या शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाला प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आता फक्त दोन विजयांची आवश्यकता आहे.
टायटन्सना या हंगामात फक्त दोनदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांचे साई सुदर्शन आणि प्रसिद्ध कृष्णा हे आघाडीवर असून अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. गुजरातच्या फलंदाजीतील वर्चस्वाच्या केंद्रस्थानी गिल, सुदर्शन आणि जोस बटलर हे त्रिकूट आहे. एकत्रितपणे त्यांनी 300 पेक्षा जास्त धावा करण्याबरोबर 150 पेक्षा जास्त असा प्रभावी स्ट्राईक रेट देखील राखला आहे. यामध्ये सातत्य आणि आक्रमक दृष्टिकोन या दोन्हींचा समावेश राहिलेला आहे. हंगामाच्या सुऊवातीला वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतलेल्या कागिसो रबाडाला गमावल्यानंतरही टायटन्सची गोलंदाजी त्यांची प्रमुख ताकद राहिलेली आहे.
दुखापतींमुळे अनेक वेळा संघाबाहेर पडल्यानंतर स्पर्धात्मक टी-20 क्रिकेटमध्ये परतलेला प्रसिद्ध कृष्णा खळबळजनक कामगिरी करत आहे. त्याने आठ सामन्यांत 14.12 च्या सरासरीने 16 बळी घेतले आहे. फलंदाजांना चकविण्याची आणि टप्पा बदलण्याची त्याची क्षमता ही त्याच्या यशाची गुऊकिल्ली आहे. मोहम्मद सिराजनेही प्रभावी मारा केलेला असून आतापर्यंत 12 बळी घेतले आहेत आणि आघाडीच्या गोलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. आर. साई किशोर देखील या हंगामात बळी घेणाऱ्या आघाडीच्या पाच गोलंदाजांमध्ये सामील झाला आहे. या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने 8.22 च्या इकोनॉमी रेटने 12 बळी घेतले आहेत.
याव्यतिरिक्त टायटन्सची संघरचना जवळजवळ पक्की असून त्यांनी परिस्थितीनुसार इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर किंवा कुलवंत खेजरोलिया यांनी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून वापरलेले आहे. याउलट, राजस्थान रॉयल्स या आठवड्याच्या सुऊवातीला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरकडून 11 धावांनी पराभूत झाल्यानंतर प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. हा त्यांचा सलग पाचवा पराभव आणि नऊ सामन्यांतील सातवा पराभव होता. ते आता गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. पहिल्या आवृत्तीतील या विजेत्यांना संपूर्ण हंगामात गती मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. ते त्यांच्या मागील तीन सामन्यांमध्ये विजयाच्या जवळ पोहोचले होते, परंतु शेवटी त्यांच्या वाट्याला अपयश आले,
राजस्थानला दिल्ली कॅपिटल्सकडून झालेल्या सुपर ओव्हरमधील पराभवासह अनेक चुरशीच्या लढतींत कमी फरकाने पराभवाला सामोरे जावे लागलेले आहे. त्यांचे वरच्या फळीतील फलंदाज यशस्वी जैस्वाल, रियान पराग आणि नितीश राणा यांनी काही प्रमाणात फॉर्म दाखवलेला असला, तरी त्यांची गोलंदाजी निराशाजनक राहिलेली आहे. धावांचा ओघ नियंत्रित करण्यात आणि निर्णायक क्षणी बळी घेण्यात ते अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे आता त्यांना त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये केवळ उरलीसुरली पत सांभाळण्यासाठी खेळावे लागेल.
संघ : राजस्थान रॉयल्स-रियान पराग (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे, कुमार कार्तिकेय, युद्धवीर सिंह चरक, कुणाल सिंह राठोड, आकाश मधवाल, फजलहक फाऊकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (जखमी).
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, बी. साई सुदर्शन, शाहऊख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्र, गुरनूर ब्रार आणि करिम जनात.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.