For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

गुजरात टायटन्सची विजयी सलामी, मुंबई पराभूत

06:58 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुजरात टायटन्सची विजयी सलामी  मुंबई पराभूत

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा 6 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात मुंबईला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज होती. पण उमेश यादवच्या या षटकामध्ये कर्णधार हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला हे दोन फलंदाज पाठोपाठच्या चेंडूवर बाद झाल्याने मुंबई इंडियन्सला निसटत्या पराभवाला तोंड द्यावे लागले.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी दिली. गुजरातने 20 षटकात 6 बाद 168 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 बाद 162 धावा जमविल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला.

Advertisement

गुजरातच्या डावामध्ये सलामीची जोडी कर्णधार गिल आणि साहा यानी 4 षटकात 31 धावांची भागीदारी केली. बुमराहच्या गोलंदाजीवर साहाचा त्रिफळा उडाला. त्याने 15 चेंडूत 4 चौकारासह 19 धावा जमविल्या. गिलला साई सुर्दशनकडून चांगली साथ मिळाली या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 33 धावांची भर घातली. कर्णधार गिलने आपल्या मनगटी फटक्यांचा वापर अप्रतिम केला. गिलने पंड्याच्या गोलंदाजीवर 11 धावा ठोकल्या त्यामध्ये 1 चौकाराचा समावेश आहे. फिरकी गोलंदाज मुलानीच्या गोलंदाजीवर गिलने 1 चौकार मारला. त्यानंतर त्याने उत्तुंग षटकारही खेचला. पण चावलाच्या गोलंदाजीवर पुन्हा षटकार मारण्याच्या नादात गिल शर्माकरवी झेलबाद झाला. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 31 धावा जमविल्या. ओमरझाई आणि सुदर्शन यानी तिसऱ्या गड्यासाठी 40 धावांची भागीदारी केली. कोएत्झीने ओमराझाईला झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17 धावा जमविल्या. बुमराहच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलरचा झेल हार्दिक पंड्याने टिपला. त्याने 1 चौकारासह 12 धावा जमविल्या. बुमराहने आपल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर मिलरला तर तिसऱ्या चेंडूवर नंतर सामनावीर ठरलेल्या साई सुदर्शनला झेलबाद केले. सुदर्शनने 39 चेंडूत 1 षटकार 3 चौकारासह 25 धावा जमविल्या. राहुल तेवातीयाने 15 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 22 धावा जमविल्याने गुजरातला 168 धावापर्यंत मजल मारता आली.

Advertisement

गुजरातच्या डावामध्ये 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. गुजरातने  पॉवरप्लेच्या 6 षटकात 47 धावा जमविताना 1 गडी गमविला. गुजरातचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 68 चेंडूत तर दिडशतक 107 चेंडूत फलकावर लागले. मुंबई संघातून बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 14 धावात 3 गडी तर कोएत्झीने 27 धावात 2 व चावलाने 1 गडी बाद केला. तब्बल दोन वर्षानंतर आयपीएल स्पर्धेत पुन्हा आगमन करताना पहिल्या सामन्यात बुमराहची कामगिरी निश्चितच चांगली झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व पहिल्यांदाच हार्दिक पंड्या करीत असताना गुजरात टायटन्सच्या कर्णधाराची जबाबदारी शुभमन गिलवर सोपविण्यात आली होती.

प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबईच्या डावाला डळमळीत सुरूवात झाले. ओमरझाईच्या पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीच ईशान किशन खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि नमन धिर यानी फटकेबाजी करत 14 चेंडूत 30 धावा झोडपल्या. ओमरझाईने मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का देताना धिरला पायचीत केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 20 धावा जमविल्या.

रोहित शर्मा आणि ब्रेव्हिस यानी तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. साई किशोरच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा पायचीत झाला. त्याने 29 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 43 धावा जमविल्या. ब्रेव्हिसला मोहित शर्माने टिपले. त्याने 38 चेंडूत 3 षटकार आणि 2 चैकारासह 46 धावा जमविल्या. मोहित शर्माने डेव्हिडला मिलरकरवी झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा केल्या. जॉन्सने तिलक वर्माला झेलबाद केल्याने मुंबई संघावर अधिकच दडपण आले. वर्माने 19 चेंडूत 1 षटकार 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. 19 षटकात मुंबई इंडियन्सने 7 बाद 150 धावा जमविल्या होत्या.

मुंबई संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी 19 धावांची गरज होती. हे शेवटचे षटक टाकण्यासाठी उमेश यादवकडे चेंडू सोपविण्यात आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार पंड्याने षटकार खेचला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार मारल्याने गुजरात संघावर दडपण आले. पण या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तेवातीयाने हार्दिक पंड्याचा झेल टिपला. पंड्याने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. उमेश यादवच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर चावला रशिद खानकरवी झेलबाद झाला. मुलानीने पाचव्या चेंडूवर 1 धाव तर बुमराहने शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतल्याने मुंबई इंडियन्सला अखेर विजयाने हुलकावणी दिली. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 9 बाद 162 धावा जमविल्या.

मुंबईच्या डावात 6 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 2 गडी गमविले. मुंबईचे अर्धशतक 34 चेंडूत, शतक 67 चेंडूत तर दिडशतक 112 चेंडूत फलकावर लागले. या सामन्यात गुजरात टायटन्सने साई सुदर्शनच्या जागी मोहित शर्माला तर मुंबई इंडियन्सने वुडच्या जागी ब्रेव्हिसला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आणले. गुजरात संघातर्फे ओमरझाई, उमेश यादव, स्sपन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. साई किशोरने 1 बळी घेतला.

संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकात 6 बाद 168 (साहा 19, गिल 31, साई सुदर्शन 45, ओमरझाई 17, मिलर 12, विजयशंकर नाबाद 6, तेवातिया 22, रशिद खान नाबाद 4, अवांतर 12, बुमराह 3-14, कोएत्झी 2-27, चावला 1-31), मुंबई इंडियन्स 20 षटकात 9 बाद 162 (रोहीत शर्मा 43, नमन धीर 20, ब्रेव्हिस 46, तिलक वर्मा 25, डेव्हीड 11, हार्दिक पंड्या 11, अवांतर 3, ओमरझाई, उमेश यादव, जॉन्सन, मोहित शर्मा प्रत्येकी दोन बळी, साईकिशोर एक बळी).

Advertisement
Tags :
×

.