गुजरात टायटन्स प्ले ऑफच्या उंबरठ्यावर
सनरायजर्स हैदराबादला नमवत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी : हैदराबाद स्पर्धेबाहेर :
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने घरच्या मैदानात सनरायजर्स हैदराबादवर 38 धावांनी विजय साकारला. गिल आणि जोस बटलर यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर गुजरातला प्रथम फलंदाजी करताना 224 धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. अभिषेक शर्माने अर्धशतक झळकावले खरे, पण त्यानंतर तो लगेच बाद झाला. अभिषेक शर्मा बाद झाला आणि तिथेच हैदराबादने सामना गमावला. गुजरातने 38 धावांनी विजय मिळवता गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. पराभवामुळे हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे.
गुजरातने विजयासाठी दिलेल्या 225 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला ट्रेव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी अपेक्षित सुरुवात करुन देताना 49 धावांची सलामी दिली. दरम्यान, हेडला (20) प्रसिध कृष्णाने बाद करत गुजरातला पहिले यश मिळवून दिले. यानंतर इशान किशनही स्वस्तात बाद झाला. 13 धावांवर कोएत्झीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. दोन विकेट पडल्यानंतर अभिषेक शर्माने 41 चेंडूत 4 चौकार व 6 षटकारासह 74 धावांची खेळी साकारली. अभिषेक मैदानात असेपर्यंत हैदराबाद हा सामना जिंकेल अशी चिन्हे होती, पण तो बाद झाला अन् हैदराबादने हा सामना गमावला. स्टार फलंदाज हेनरिक क्लासेन देखील आज संघासाठी विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याने आज संघासाठी 18 चेंडूंमध्ये 23 धावा केल्या आहेत. पॅट कमिन्सने 10 चेंडूंमध्ये 19 धावा केल्या आणि नाबाद राहिला. गुजरातला 20 षटकांत 6 बाद 186 धावापर्यंत मजल मारता आली. त्यांना या सामन्यात 38 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातकडून मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णाने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
गुजरातचा दणकेबाज विजय
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हैदराबादने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला साई सुदर्शन व शुभमन गिल यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असताना साई सुदर्शनला अन्सारनी बाद केले. साई सुदर्शनने 48 धावा केल्या. सुदर्शन बाद झाल्यानंतर गिल व जोस बटलर यांनी अर्धशतकी भागीदारी केली.
यादरम्यान, गिलने अर्धशतकी खेळी साकारताना 38 चेंडूत 10 चौकार व 2 षटकारासह 76 धावांचे योगदान दिले. बटलरने देखील आक्रमक खेळताना 37 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह 64 धावांची खेळी साकारली. गिल व बटलरच्या या दमदार खेळीच्या जोरावर गुजरातने 6 बाद 224 धावांचा डोंगर उभा केला. दरम्यान, गुजरातचा हा सातवा विजय असून गुणतालिकेत ते आता दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आणखी एका विजयाची गरज आहे.
संक्षिप्त धावफलक
गुजरात टायटन्स 20 षटकांत 6 बाद 224 (साई सुदर्शन 48, शुभमन गिल 76, जोस बटलर 64, वॉशिंग्टन सुंदर 21, उनादकट 3 बळी, पॅट कमिन्स व झीशान अन्सारी प्रत्येकी एक बळी)
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 186 (ट्रेव्हिस हेड 20, अभिषेक शर्मा 74, इशान किशन 13, हेन्रिक क्लासेन 23, नितीश रे•ाr नाबाद 21, पॅट कमिन्स नाबाद 19, मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा प्रत्येकी 2 बळी, इशांत शर्मा, कोएत्झी प्रत्येकी एक बळी).