महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात जायंट्सचा युपी वॉरियर्सवर विजय

06:55 AM Mar 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्णधार बेथ मुनीचे नाबाद अर्धशतक, दीप्ती शर्माची संस्मरणीय खेळी वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेतील सोमवारी येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात गुजरात जायंट्सने युपी वॉरियर्सचा 8 धावांनी पराभव केला. गुजरात जायंट्स संघातील कर्णधार मुनीने नाबाद अर्धशतक (74) झळकाविले. तर या स्पर्धेत 295 धावांसह ऑरेंज कॅपची मानकरी ठरलेल्या दीप्ती शर्माचे नाबाद अर्धशतक वाया गेले. 11 धावांत 3 बळी टिपणाऱ्या शबनम शकीलला सामनावीराचा बहुमान मिळाला.

या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. गुजरात जायंट्सने 20 षटकात 8 बाद 152 धावा जमविल्या. त्यानंतर युपी वॉरियर्सने 20 षटकात 5 बाद 144 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 8 धावांनी गमवावा लागला. आता यूपी वॉरियर्सला प्लेऑफ फेरी गाठण्यासाठी अन्य सामन्यांच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. मंगळवारी मुंबई इंडियन्स व आरसीबी यांची लढत होणार असून आरसीबी मोठ्या फरकाने पराभूत झाली तरच  यूपी वॉरियर्सला आगेकूच करण्याची संधी मिळेल.

बेथ मुनीचे अर्धशतक

गुजरात जायंट्सच्या डावाला मुनी आणि वुलव्हार्ट यांनी दमदार प्रारंभ करुन देताना 47 चेंडूत 60 धावांची भागिदारी केली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर युपी वॉरियर्सच्या गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज पाठोपाठ बाद झाले. वुलव्हार्टने 30 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 43, गार्डनरने 10 चेंडूत 1 षटकार, 1 चौकारासह 15, ब्राईसने 2 चौकारांसह 11 धावा जमविल्या. गुजरात जायंट्सच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. कर्णधार मुनीने 52 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 74 धावा झोडपल्या. युपी वॉरियर्सतर्फे इक्लेस्टोनने 38 धावांत 3, दीप्ती शर्माने 22 धावात 2, चमारी अटापटू आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. गुजरात जायंट्सच्या डावात 3 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. गुजरात जायंट्सने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 53 धावा जमविल्या. त्यांचे पहिले अर्धशतक 33 चेंडूत, शतक 79 चेंडूत तर दीडशतक 120 चेंडूत फलकावर लागले. मुनीने 42 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना युपी वॉरियर्सच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच षटकातील तिसऱ्या आणि शेवटच्या चेंडूवर युपी वॉरियर्सचे 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले. शबनमने आपल्या पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कर्णधार हिलीला 4 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर तिने या षटकातील शेवटच्या चेंडूवर अट्टापटूला खाते उघडण्यापूर्वीच झेलबाद केले. दुसऱ्या षटकामध्ये युपी वॉरियर्सने आणखी एक फलंदाज गमविला. ब्राईसने नवगिरेला खाते उघडण्यापूर्वीच कश्यपकरवी झेलबाद केले. युपी वॉरियर्सची स्थिती यावेळी 3 बाद 4 अशी केविलवाणी होती. गार्डनरने हॅरिसला एका धावेवर बाद करुन युपी वॉरियर्सवर अधिकच दडपण आणले. शबनमने युपी वॉरियर्सला आणखी एक धक्का देताना श्वेता सेहरावतचा त्रिफळा उडविला. तिने 9 चेंडूत 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सने यावेळी 7 षटकात 5 बाद 35 धावा जमविल्या होत्या.

दीप्ती शर्मा आणि पूनम खेमार यांनी दमदार फलंदाजी करत संघाला विजयाच्या समिप आणले. दीप्ती शर्माने 60 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 88 तर खेमारने 36 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 36 धावा जमविल्या. युपी वॉरियर्सने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 30 धावा जमविताना 4 गडी गमाविले. दीप्ती शर्मा आणि खेमार यांनी सहाव्या गड्यासाठी 13 षटकात 109 धावांची अभेद्य शतकी भागिदारी केली. युपी वॉरियर्सच्या डावात 5 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. युपी वॉरियर्सचे पहिले अर्धशतक 57 चेंडूत, शतक 98 चेंडूत नोंदविले गेले. दीप्ती आणि खेमार यांनी 73 चेंडूत शतकी भागिदारी केली. गुजरात जायंट्सतर्फे शबनमने 11 धावांत 3 तर ब्राईस आणि गार्डनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक - गुजरात जायंट्स 20 षटकात 8 बाद 152 (मुनी नाबाद 74, वुलव्हर्ट 43, गार्डनर 15, ब्राईस 11, अवांतर 3, इक्लेस्टोन 3-38, दीप्ती शर्मा 2-22, अटापटू 1-25, गायकवाड 1-28), युपी वॉरियर्स 20 षटकात 5 बाद 144 (दीप्ती शर्मा नाबाद 88, पुनम खेमार नाबाद 36, सेहरावत 8, हिली 4, अवांतर 7, शबनम 3-11, ब्राईस 1-26, गार्डनर 1-30).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article