For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुजरात ठरले दिल्लीवर भारी

06:56 AM Apr 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
गुजरात ठरले दिल्लीवर भारी
Advertisement

दिल्ली 7 गड्यांनी पराभूत : सामनावीर जोस बटलरची 54 चेंडूत नाबाद 97 धावांची खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

शनिवार अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने नंबर वन दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला. यासह, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने हंगामातील पाचवा विजय मिळवताना गुणतालिकेत अव्वलस्थान मिळवले आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 203 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर विजयासाठीचे 204 धावांचे लक्ष्य गुजरातने शेवटच्या षटकात गाठले. या विजयाचे हिरो जोस बटलर आणि प्रसिद्ध कृष्णा ठरले. बटलरने नाबाद 97 धावा केल्या तर प्रसिद्धने 4 विकेट घेत गुजरातच्या विजयात मोलाचे योगदान दिले. दरम्यान, गुजरातचा हा सात सामन्यातील पाचवा विजय ठरला आहे.

Advertisement

दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल 7 धावा करुन बाद झाला. यानंतर साई सुदर्शन व जोस बटलर यांनी संघाचा डाव सावरताना अर्धशतकी सलामी दिली. ही जोडी जमलेली असताना सुदर्शनला कुलदीपने माघारी पाठवले. त्याने 21 चेंडूत 36 धावांचे योगदान दिले. यानंतर जोस बटलर व रुदरफोर्ड यांनी 119 धावांची भागीदारी करत गुजरातच्या विजयाचा पाया रचला. बटलरने अफलातून खेळी साकारताना अवघ्या 54 चेंडूत 11 चौकार व 4 षटकारासह नाबाद 97 धावांची खेळी साकारली. शतकापासून मात्र तो वंचित राहिला. रुदरफोर्डने 43 धावांचे योगदान दिले. रुदरफोर्डचा अडथळा मुकेश कुमारने दूर केला. रुदरफोर्ड बाद झाल्यानंतर राहुल तेवतियाने अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार खेचत गुजरातला विजय मिळवून दिला. दिल्लीकडून कुलदीप व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

राजधानी एक्सप्रेस घसरली

प्रारंभी, गुजरातने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीला दुसऱ्याच षटकात पहिला धक्का बसला. अभिषेक पोरेल 18 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर करुण नायरने 31 तर केएल राहुलने 28 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार अक्षर पटेल व ट्रिस्टन स्टब्ज यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला सावरले. अक्षरने 39 तर स्टब्जने 31 धावा फटकावल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर यानंतर अखेरच्या काही षटकात आशुतोष शर्माने 19 चेंडूत 37 धावांची वादळी खेळी साकारल्यामुळे दिल्लीने 8 गडी गमावत 203 धावांचा डोंगर उभा केला. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णाने शानदार गोलंदाजी करताना 41 धावांत 4 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 8 बाद 203 (अभिषेक पोरेल 18, करुण नायर 31, केएल राहुल 28, अक्षर पटेल 39, ट्रिस्टन स्टब्ज 31, आशुतोष शर्मा 37, प्रसिद्ध कृष्णा 41 धावांत 4 बळी, सिराज, अर्शद खान, इशांत शर्मा व साई किशोर प्रत्येकी एक बळी)

गुजरात टायटन्स 19.2 षटकांत 3 बाद 204 (साई सुदर्शन 36, शुभमन गिल 7, जोस बटलर 54 चेंडूत 11 चौकार व 4 षटकारासह नाबाद 97, रुदरफोर्ड 34 चेंडूत 43, राहुल तेवतिया नाबाद 11, मुकेश कुमार व कुलदीप यादव प्रत्येकी एक बळी).

नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा यशस्वी पाठलाग

आयपीएलच्या इतिहासात नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाठलाग करण्याचा हा तिसरा सर्वात मोठा यशस्वी टप्पा आहे. या मैदानावर सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केकेआरच्या नावावर आहे, त्यांनी 2023 मध्ये गुजरातविरुद्ध 206 धावांचे लक्ष्य गाठले होते. आता गुजरात या यादीत दुसऱ्या स्थानावर आले आहेत. याचवेळी, आरसीबीने नरेंद्र मोदी स्टेडियमवर 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य देखील गाठले आहे.

Advertisement
Tags :

.