For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोमांचक सामन्यात गुजरातची राजस्थानवर मात

06:58 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोमांचक सामन्यात  गुजरातची राजस्थानवर मात
Advertisement

आयपीएल 17 : रशीद खान ठरला गुजरातच्या विजयाचा हिरो :  शुभमन गिल, राहुल तेवातियाचीही चमक

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या आयपीएलमधील सामन्यात गुजरात टायटन्सने अखेर राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखला. राजस्थान रॉयल्सने ठेवलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेवटच्या चेंडूवर रशिद खानने चौकार मारत रोमांचक विजय साकारला. गुजरातने राजस्थानचा 3 विकेट्सनी पराभव करत राजस्थानची सलग चार विजयाची मालिका खंडित केली. प्रारंभी, रियान पराग व कर्णधार संजू सॅमसन यांनी नोंदवलेल्या अर्धशतकांच्या बळावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 3 बाद 196 केल्या. यानंतर गुजरातने हे विजयी आव्हान 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केले. राजस्थानचा यंदाच्या हंगामातील पहिलाच पराभव ठरला आहे. दुसरीकडे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरातचा हा तिसरा विजय आहे.

Advertisement

197 धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातने सावध आणि आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर साई सुदर्शन व शुभमन गिल यांनी 64 धावांची सलामी दिली. राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनने कुलदीप सेनला गोलंदाजीची संधी दिली. कुलदीपने संजू सॅमसनचा विश्वास सार्थ ठरवत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. त्याने साई सुदर्शनला 35 धावांवर बाद केले. यानंतर कुलदीपने पुढील ओव्हरमध्ये गुजरातला आणखी दोन धक्के दिले. त्याने अनुभवी मॅथ्यू वेड व अभिनव मनोहर यांना माघारी पाठवले. फिरकीपटू चहलने विजय शंकरला व कर्णधार शुभमन गिलला बाद करत राजस्थानला मोठे यश मिळवून दिले. एकीकडे विकेट जात असताना कर्णधार गिलने 44 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 72 धावांचे योगदान दिले. विजय शंकर 16 धावा काढून बाद झाला. यानंतर मात्र राहुल तेवातिया व रशिद खान यांनी राजस्थानच्या हातून विजय खेचून आणला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात रशीद खानने अफलातून खेळी साकारली. त्याने 11 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 24 धावा फटकावल्या तर तेवातियाने 11 चेंडूत 3 चौकारासह 22 धावा फटकावल्या.

राजस्थानचा हंगामातील पहिला पराभव

प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने घरच्या मैदानावर शानदार खेळी साकारली. पॉवरप्लेमध्ये 2 बाद 42 अशी राजस्थानची धावसंख्या असताना गुजरातने चांगले नियंत्रण मिळविले होते. पण नंतर कर्णधार सॅमसन व रियान पराग यांनी शानदार अर्धशतके नोंदवत नियंत्रण राजस्थानला मिळवून दिले. सॅमसनने 38 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 68 तर परागने 48 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांचा पाऊस पाडत 76 धावा झोडपल्या. राजस्थानने शेवटच्या दहा षटकांत तब्बल 123 धावा तडकावल्या. चौथ्या क्रमांकावर खेळणाऱ्या परागने पाच डावातील तिसरे अर्धशतक नोंदवताना पूर्ण बहरात असणाऱ्या सॅमसनसमवेत 78 चेंडूत 130 धावांची भागीदारी केली. परागला मॅथ्यू वेडने रशिद खानच्या गोलंदाजीवर 0 व 6 धावांवर जीवदाने दिली, जी गुजरातला बरीच महाग पडली. याचा लाभ घेत 22 वर्षीय परागने एकूण 5 षटकार हाणले, त्यापैकी तीन षटकार त्याने नूर अहमदला स्वीप शॉटवर नोंदवले. त्याने मोहित शर्माला फ्लॅट षटकार ठोकत अर्धशतक नोंदवले.

सॅमसनने लागोपाठ चौकार मारून सुरुवात केली असली तरी परागची फटकेबाजी सुरू असताना त्याने दुय्यम भूमिका घेत त्याला जास्त संधी दिली. गुजरातचे क्षेत्ररक्षणही गचाळ झाले, त्याचा लाभ राजस्थानला झाला. सॅमसनने मोहितच्या फुलटॉसवर चौकार ठोकत तिसरे अर्धशतक पूर्ण केले. लाँगऑनवर हा झेल राहुल तेवातियाने टिपायला हवा होता. 19 व्या षटकात परागने मोहितच्या बाऊन्सरवर मिडविकेटच्या दिशेने षटकार ठोकला. सॅमसन-पराग जोडी जमण्याआधी सलामीवीर यशस्वी जैस्वालने 19 चेंडूत 24 धावा जमविताना काही चांगले फटके मारले. पण उमेश यादवला स्कूप करताना तो बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. त्याचा सलामीचा जोडीदार जोस बटलर (8) सहाव्या षटकात रशिद खानला जोरदार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा पहिल्या स्लिपमध्ये उडालेला झेल तेवातियाने अचूक टिपत त्याला माघारी धाडले. हेतमायरने 5 चेंडूत नाबाद 13 धावा फटकावताना 1 चौकार, 1 षटकार मारला.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 3 बाद 196 : यशस्वी जैस्वाल 19 चेंडूत 24, बटलर 10 चेंडूत 8, सॅमसन 38 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 68, रियान पराग 48 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांसह 76, हेतमायर 5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 13, अवांतर 7. रशिद खान 1-18, उमेश यादव 1-47, मोहित शर्मा 1-51.

गुजरात टायटन्स 20 षटकांत 7 बाद 199 (साई सुदर्शन 35, शुभमन गिल 72, राहुल तेवातिया 22, रशिद खान नाबाद 24, कुलदीप सेन 3 तर चहल 2 तर अवेश खान 1 बळी).

Advertisement

.