गुजरातची पंजाबवर तीन गडी राखून मात
राहुल तेवतिया ठरला मॅच फिनिशिर : सामनावीर साई किशोरचे 4 बळी : पंजाबचा पराभवाचा सिलसिला कायम
वृत्तसंस्था/ मुलानपूर
येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाबवर 3 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा संघ 20 षटकांत 142 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात, गुजरातने विजयी लक्ष्य 19.1 षटकांत 7 गडी गमावत पार केले. या विजयासह गुजरातचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आला आहे. दुसरीकडे पंजाबचा पराभवाचा सिलसिला कायम राहिला. दरम्यान, 33 धावांत 4 बळी घेणाऱ्या गुजरातच्या साई किशोर सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. सलामीवीर वृद्धिमान साहा 13 धावा काढून बाद झाला. कर्णधार शुभमन गिलही मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. त्याने 5 चौकारासह 35 धावा फटकावल्या. साई सुदर्शन (31) व डेव्हिड मिलर (4) हे देखील फारसा चमत्कार दाखवू शकले नाहीत. उमरझाईही 13 धावांवर बाद झाल्याने गुजरातचा संघ संकटात सापडला होता. पण, राहुल तेवतियाने 18 चेंडूत 7 चौकारासह नाबाद 36 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तेवतियाच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने विजयी आव्हान 19.1 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. रशीद खान 3 धावा काढून बाद झाला. पंजाबकडून हर्षल पटेलने 3 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 2 बळी घेतले. अर्शदीप सिंग आणि सॅम करन यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
गुजरातचा शानदार विजय
या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार सॅम करण व प्रभसीमरन सिंगने डावाला चांगली सुरूवात करून देताना 33 चेंडूत 52 धावांची भागीदारी केली. मोहित शर्माने प्रभसीमरन सिंगला झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 3 षटकार 3 चौकारासह 35 धावा जमविल्या. यानंतर पंजाबचे खेळाडू गुजरातच्या अचुक गोलंदाजीसमोर झटपट बाद झाले. पंजाबच्या डावामध्ये एकाही फलंदाजाला 40 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. कर्णधार सॅम करनने 19 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा जमविल्या. जितेश शर्माने 12 चेंडूत 1 षटकारासह 13, हरप्रित ब्रारने 12 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 29 तर हरप्रित सिंगने 19 चेंडूत 14 धावा जमविल्या. ठराविक अंतराने विकेट गेल्याने पंजाबचा डाव 142 धावांवर आटोपला. गुजराततर्फे साई किशोर तसेच मोहित शर्मा आणि नुर अहमद प्रभावी गोलंदाज ठरले. साई किशोरने 33 धावात 4, नूर अहमदने 20 धावात 2, मोहित शर्माने 32 धावात 2 तर रशिद खानने 15 धावात 1 गडीबाद केला.
संक्षिप्त धावफलक : किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकात सर्व बाद 142 (सॅम करन 20, प्रभसिमरन सिंग 35, जितेश शर्मा 13, हरप्रित सिंग 14, हरप्रित ब्रार 29, अवांतर 4, साई किशोर 4-32, नूर अहमद 2-20, मोहित शर्मा 2-32, रशिद खान 1-15)
गुजरात टायटन्स 19.1 षटकांत 7 बाद 146 (वृद्धिमान साहा 13, शुभमन गिल 35, साई सुदर्शन 31, राहुल तेवतिया नाबाद 36, हर्षल पटेल 15 धावांत 3 बळी, लिव्हिंगस्टोन 2 तर अर्शदीप, सॅम करन प्रत्येकी एक बळी).