पशुसंगोपनतर्फे पोल्ट्री चालकांना मार्गदर्शन
व्यवसाय वृद्धीसाठी उपक्रम : तांत्रिक बाबींची दिली माहिती
बेळगाव : कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यवसाय अधिक मजबूत करण्यासाठी शुक्रवारी पशुसंगोपन खात्यामार्फत पोल्ट्री चालकांना एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पाटील होते. आंबेवाडी पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. प्रताप हन्नुरकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. निलेश गुरसे यांनी कुक्कुटपालनाविषयी शास्त्रशुद्ध माहिती देऊन व्यवसाय विस्तारण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पोल्ट्री चालकांना शास्त्रोक्त ज्ञान आणि त्यातील तांत्रिक गोष्टीची माहिती देण्यात आली. कोंबडी आणि कोंबड्यांच्या पिल्लांच्या संगोपनाबाबत माहिती विषद करण्यात आली आहे.अलीकडच्या काही वर्षांत पोल्ट्री व्यवसाय आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगारच्या संधी उपलब्ध होत आहेत.
अनेकांनी पोल्ट्री व्यवसाय सुरू करून अर्थार्जन केले आहे. मात्र काही जण मार्गदर्शनाअभावी या व्यवसायात अयशस्वी होऊ लागले आहेत. यासाठी पोल्ट्री व्यवसायाबाबत योग्य ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशीपालन, करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र प्रशिक्षणाविना व्यवसाय चालविणे अडचणीचे ठरू लागले आहे. व्यवसाय कसा वाढवावा? याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पोल्ट्रीत आल्यानंतर लहान पिल्लांची काळजी, आजार, औषध, लसीकरण आणि इतर दक्षता कशी घ्यावी? याबाबतही डॉक्टरांनी माहिती दिली. यावेळी डॉ. रमेश पाटील यांनीही पोल्ट्री व्यवसायाबाबत अधिक माहिती दिली. याप्रसंगी डॉ. मनी शिंदे यासह पशुवैद्यकीय अधिकारी व बेळगाव, खानापूर तालुक्यातील बहुसंख्य पोल्ट्री चालक उपस्थित होते.