पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्गदर्शन शिबिर
वार्ताहर/ उचगाव
बेनकनहळ्ळी येथील ‘ब्रम्हलिंग आत्मा शेतकरी संघटना’ या संस्थेच्यावतीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकावर किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या ‘दशपर्णी’ या कीटकनाशक औषधाची कशी निर्मिती करावी आणि त्याचा कसा शेतातील पिकांना वापर करावा, या संदर्भातील मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जवळपास शंभर शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी बाळू परशराम देसूरकर हे होते. तसेच मार्गदर्शक करण्यासाठी म्हणून कृषी खात्याचे सी. एस. नायक, राजशेखर भट, मल्लेश नाईक उपस्थित होते. उपस्थित कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सध्या रासायनिक खतामुळे शेतीच्या मातीचा कस कसा कमी होत आहे, तसेच रासायनिक खतामुळे तयार होणाऱ्या पिकांतून मनुष्य जीवनातील त्यांच्या आरोग्यावर कसा दुष्परिणाम होत आहे. वेगवेगळ्या अनेक आजारांना आपण कसे बळी पडत आहोत, हे सांगून सध्या सेंद्रिय खतांची नितांत गरज कशी आहे. हे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून सांगितले. यासाठीच ब्रह्मलिंग आत्मा शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या सेंद्रिय खताच्या निर्मिती संदर्भात त्यांनी त्यांचे कौतुक केले. सदर औषध तयार करून ती शेतकऱ्यांना मोफत देणे हीसुद्धा एक समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान या संस्थेचे असल्याचे त्यांनी सांगून या दशपर्णी कीटकनाशक औषधामुळे पिकावरील होणारे रोग कमी होतील. तसेच पिके चांगली भरघोस येतील आणि नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका पोहोचणार नाही, यासाठी शेतकऱ्यांनी या दशपर्णी औषधाचा उपयोग करावा, असे यावेळी या कृषी खात्याकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन बाळू पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे सेक्रेटरी मल्लाप्पा परशराम पाटील यांनी केले.