For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kokan News: शहरवासीय करणार सागरी किनाऱ्यांची स्वच्छता, नियोजनासाठी बैठक

06:14 PM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
kokan news  शहरवासीय करणार सागरी किनाऱ्यांची स्वच्छता  नियोजनासाठी बैठक
Advertisement

शहरवासियांच्या बैठकीत या उपक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली

Advertisement

गुहागर : गुहागर शहर सर्वांग सुंदर दिसावं, पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेता यावा यासाठी शहरवासीय 20 सप्टेंबर रोजी संपूर्ण समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करणार आहेत. आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस स्वच्छतेच्या चळवळीने राबवला जावा याच्या नियोजनासाठी शनिवारी श्रीदेव व्याडेश्वर सभागृहामध्ये नगर पंचायतीच्यावतीने घेण्यात आलेल्या शहरवासियांच्या बैठकीत या उपक्रमाची रुपरेषा ठरवण्यात आली.

20 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्याचे औचित्य साधून सर्व शहरवासियांना बरोबर घेऊन स्वच्छतेची ही मोहीम अधिक व्यापकपणे राबवण्यात येणार आहे. बैठकीत स्वच्छतेविषयी रुपरेषा ठरवताना शहराला लाभलेला सहा किलोमीटरचा समुद्रकिनारा स्वच्छ व्हावा यासाठी सात विभाग पाडण्यात आले.

Advertisement

यामध्ये पाचमाड परिसर ते पिंपळादेवी मंदिर, दुर्गादेवी मंदिर ते भोसले गल्ली, भोसले गल्ली ते रामेश्वर स्मशानभूमी, रामेश्वर स्मशानभूमी ते बाजारपेठ, बाजारपेठ ते किस्मत आणि किस्मत ते खालचा पाठ अशा सात विभागाचे प्रत्येकाकडे प्रतिनिधित्व देण्यात आले. या विभागाचे प्रतिनिधित्व घेणारा व्यक्ती आपल्याबरोबर स्वच्छता दूत घेऊन येणार आहे.

त्याचबरोबर प्रत्येक विभागात नगरपंचायत कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, बचत गटाचे सदस्य असा 50 जणांचा चमू करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी केले. चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे भाऊ काटदरे यांनी, आपला परिसर अधिक निसर्गरम्य कसा ठेवता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

यावर्षी कासव महोत्सव राबवण्याबाबत नियोजन करण्याचेही निश्चित करण्यात आले. यावेळी प्रवीण जाधव, सुनील नवजेकर, सचिन जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन मुसळे, संतोष वरंडे, शामकांत खातू, मयुरेश पाटणकर, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, बचत गटाच्या प्रमुख पालशेतकर, पराग मालप, श्रीधर बागकर आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.