गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा !
कोल्हापूर :
चैत्रशुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षातील प्रथम दिन असून कोणत्याही कार्याची सुरुवात केली जाते. या आध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करुन घेत या दिवशीच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत निश्चित करावा, या उद्देशाने 'गुढी पाडवा, शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम जिल्हा परिषदेमार्फत राबवला जात आहे. त्यामुळे गुढी पाडव्याला बालकाचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या शाळेत निश्चित करुन पाल्याच्या उज्ज्वल भविष्याचा शुभारंभ करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १०० टक्के पटनोंदणी, नियमित उपस्थिती तसेच गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, माध्यान्ह भोजन योजना, शिष्यवृती, स्पर्धा परीक्षांचे यशस्वी मार्गदर्शन, डिजीटल शाळा, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा अशा विद्यार्थी हिताच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत. शासकीय तसेच जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधील विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जि. प. शाळा लोकाभिमुख होण्यास मदत झाली असल्याची माहिती डॉ. शेंडकर यांनी दिली आहे.