भाजपच्या पदाधिकाऱ्याने महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यास कारवाई
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सक्त सूचना
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे सरपंच ,उपसरपंच तसेच महायुतीचे कार्यकर्ते यांची जिल्हा परिषद न्याय आढावा बैठक पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत महायुतीने एकत्रित प्रचार करावा असे सुचित करण्यात आले. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प या आढावा बैठकीत करण्यात आला. लोकसभेला महायुतीला असलेले लीड विधानसभेलाही कायम राहावे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सरपंच ,उपसरपंच तसेच इतर पदाधिकाऱ्यांना केले. तसेच काही कार्यकर्ते इतर कुणाचे काम करत असतील तर त्याची माहिती आपल्याला द्यावी. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल अशा सक्त सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिल्या आहेत. सावंतवाडी राजवाडा येथे ही बैठक झाली. यावेळी भाजपा- शिवसेना शिंदे गटाचे रिपब्लिकन आठवले गटाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते ,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . झालेल्या बैठकीत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विस्तृत आढावा घेतला. सरपंच ,उपसरपंच हे गावातील प्रमुख घटक असल्याने आणि मतदार संघात 75 टक्क्याहून अधिक सरपंच ,उपसरपंच महायुतीचे असल्याने प्रमुख घटक म्हणून सरपंच ,उपसरपंच यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे . त्यांनी ती यशस्वीपणे पार पडावी त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही पालकमंत्री चव्हाण यांनी दिल्याचे सांगण्यात आले . शुक्रवारी पुन्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीतही पालकमंत्री चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत.