Solapur News: माजी आमदारांच्या प्रवेशाने जिल्ह्यात राजकीय भूकंप !
कट्टर वैरी पाटील-क्षीरसागर यांना पक्षात आणण्याची किमया भाजपने साधली
सोलापूर: मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने यांच्यासह माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, विक्रम शिंदे आदी दिग्गजांच्या भाजप प्रवेशाने सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. या बदलाने जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित असून या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. सचिन कल्याण शेट्टी हे 'गेम' चेंजर ठरले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात दमदारपणे कामाला सुरुवात केली आहे. एकीकडे आपल्याच पक्षात संस्थानिकांसारखे वागणाऱ्या व लोकसभा निवडणुकीत पक्षाला हानी पोहोचविलेल्या आमदारांची गोची करण्याबरोबरच दुसरीकडे युवा आमदारांना मोठी राजकीय ताकद देण्याचे काम ते करत आहेत.
याशिवाय संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा संकल्प करून त्यांनी इतर राजकीय पक्षातील लोकांना भाजपमध्ये आणण्याचा सपाटा लावला आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी शहरातील अन्य पक्षातील लोकांना भाजपमध्ये स्थान देण्यात आले. यानंतर १६ ऑक्टोबर रोजी सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील विरोधी पक्षांच्या अनेक दिग्गजांना भाजपमध्ये सामावून घेतले. यामध्ये काहींची घरवापसी देखील झाली. भाजपमध्ये संस्थानिकांसारखे वागणाऱ्या लोकप्रतिनिधींना ही एक प्रकारे चपराक मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने, नागनाथ क्षीरसागर,माढ्याचे रणजितसिंह शिंदे, विक्रम शिंदे आदी दिग्गज मंडळींना भाजपमध्ये प्रवेश देऊन पालकमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यात राजकीय भूकंप घडविला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील लोकांना भाजपमध्ये प्रवेश देऊन या दोन्ही पक्षांना जोरदार धक्का दिला आहे. जिल्ह्यातील विरोधकांची राजकीय ताकद कमी करण्याबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांचे पंख छाटण्याच्या पालकमंत्र्यांचा डाव दिसून येतो.
या प्रवेशाच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन कल्याणशेट्टी हे जिल्ह्यातील राजकारणाबाबत 'गेम' चेंजर ठरल्याचे दिसून येते. याशिवाय मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील व शिवसेना शिंदे सेनेचे नागनाथ क्षीरसागर या दोन एकमेकांच्या कट्टर राजकीय वैऱ्यांना एकत्र आणण्याची किमयादेखील भाजपने करून दाखवली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्र्यांची गाडी सोलापूर शहर व जिल्ह्यात सुसाट सुटली आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक जिंकण्याबरोबरच जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्याचे लक्ष्य समोर ठेवून पालकमंत्र्यांनी व्यूहरचना आखल्याचे व त्यादृष्टीने मायक्रो प्लॅनिंग करत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व माढा हे दोन्ही तालुके महत्वपूर्ण मानली जातात. या तालुक्यात भाजप कमकुवत होता, पण बुधवारी या दोन्ही तालुक्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर आगामी काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व सहकारी संस्थांच्या निवडणुकीत भाजपचे कमळ फुलण्यास मोठी मदत होईल, असे मानले जात आहे.
आता दिलीप मानेंच्या प्रवेशाकडे लक्ष !
सोलापूर शहर उत्तर, मोहोळ, माढा तालुक्यात भाजपमध्ये झालेल्या इन्कमिंगनंतर आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील दिग्गज नेते माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये लवकरच प्रवेश होणार आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. वास्तविक एक नोव्हेंबर रोजी दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश होणार होता, मात्र त्यांच्या प्रवेशास तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या विरोधामुळे हा कार्यक्रम तूर्तास लांबणीवर पडला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून दिलीप माने यांचा पक्षप्रवेश करण्यासाठी पालकमंत्री प्रयत्नशील आहेत.
रक्तातील रक्त असेपर्यंत कमळ सोडणार नाही: राजन पाटील
भाजप प्रवेशानंतर आपल्या छोटेखानी भाषणात माजी आमदार राजन पाटील म्हणाले की, आम्ही निष्ठेने राहणारी माणसे आहोत. सत्तेसाठी संधी साधून राजकारण करीत नाही. रक्तात रक्त असेपर्यंत कमळ हातात घेऊन पाटील परिवार काम करणार आहे. रात्रीचा दिवस करून भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच लोकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी आम्ही झटणार आहोत.
भाजपला शंभर टक्के यश मिळवून देण्याचा प्रयत्न : पालकमंत्री गोरे
या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, या प्रवेशाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात प्रचंड राजकीय ताकद असणाऱ्या नेत्यांना आम्ही सोबत घेतले आहे. भाजप त्यांच्या पाठीशी मोठ्या ताकदीने उभा राहील. नव्या व जुन्यांना सोबत घेऊन आता काम करणार आहोत. जिल्हा परिषद, महापालिका आदी निवडणुकांमध्ये भाजपला शंभर टक्के यश मिळण्यासाठी आम्ही मेहनत घेणार आहोत.
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही रवींद्र चव्हाण
मुंबईत झालेल्या मोहोळ व माढा तालुक्यातील दिग्गजांच्या भाजपप्रवेशानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, ज्या विश्वासाने या सर्व दिग्गज तसेच कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्या विश्वासाला आपण अजिबात तडा जाऊ देणार नाही. या दिग्गजांच्या राजकारण, सहकार व वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा घेऊन आगामी काळात प्रत्येकाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.