शस्त्रक्रियेनंतर बरे झालेल्या रुग्णाकडून पालकमंत्री जारकीहोळी यांचा सत्कार
शस्त्रक्रियेसाठी केली होती आर्थिक मदत
बेळगाव : मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या गोकाक येथील एका व्यक्तीला उपचारासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आर्थिक मदत केली आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून त्याने स्वत: हिल गार्डन येथील पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला. गोकाक येथील दस्तगीर मुगल हे गेल्या काही वर्षांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. गरिबीमुळे उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करणे कठीण होते. याची माहिती मिळताच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्या स्वीय साहाय्यकांकरवी दस्तगीर कुटुंबीयांना आर्थिक मदत पोहोचवली होती. शस्त्रक्रियेनंतर दस्तगीर आता पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यानंतर त्यांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला. शस्त्रक्रियेसाठी त्यांनी केलेल्या आर्थिक मदतीमुळे आपण बरे झालो. आपल्यासारख्या अनेकांना सतीश जारकीहोळी सातत्याने मदत करीत असतात. त्यांना गरिबांची कणव आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया दस्तगीर यांनी यावेळी दिली.