हिरेकोडीच्या विद्यार्थ्यांची पालकमंत्र्यांकडून विचारपूस
बेळगाव : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मंगळवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन हिरेकोडी (ता. चिकोडी) निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हिरेकोडी येथील मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना निवासी शाळेतील उपहार सेवन केल्यानंतर पोटदुखी व उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी 16 विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीत पूर्णपणे सुधारणा होईपर्यंत उपचार सुरू ठेवावेत, अशी सूचना डॉक्टरांना केली. जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या दर्जाची माहिती विद्यार्थ्यांकडून घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. वैद्यकीय चिकित्सा देण्यात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा डॉक्टरांना दिला. यावेळी बेळगाव वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (बिम्स) संचालक डॉ. अशेक शेट्टी यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी, डॉक्टर, रुग्णालयाचे कर्मचारी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.