फंड मंजूर असताना कामे का रखडलीत ? पालकमंत्र्यांकडे लोक बोट दाखवतायत...पालकमंत्र्यांनी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना झापलं!
कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या कामावरून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर शहरातील खराब झालेल्या खड्ड्यांवरून लोकांकडून विचारणा होत आहे. असे म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिकेच्या आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना झापलं आहे. आपल्याला कमिशन यायचं बाकी आहे म्हणून काम थांबलं असं समजल्यावर त्यांनी त्याबाबत विचारणाही केली.
कसबा बावडा येथील एसटीपी प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी त्यांनी संवाद साधताना प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुचना केल्या. कोल्हापुरातल्या विकास कामावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ आज चांगलेच भडकले. व्यासपीठावर असलेल्या आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांची आमदार जयश्री जाधव यांच्यासमोर कानउघाडणी केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "शहरामध्ये पडलेल्या खड्यांमुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. खराब रस्त्यांमुळे पालकमंत्र्यांकडे लोक बोट दाखवत आहेत. जिल्ह्यात रखडलेल्या कामांवरून वर्तमानपत्रांमध्ये टिका होत आहे. लोकांच्याकडून विचारणा होत आहेत. फंड मंजूर असताना रस्त्याची कामे पूर्ण का झाली नाहीत ? त्यामुळे आयुक्त मॅडम यांनी यामध्ये लक्ष घालून काम केलं पाहीजे. लवकरात लवकर काम पूर्ण करा अन्यथा अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला." अशा सुचना पालकमंत्र्यांनी देऊन मंजूर कामे ताबडतोब करण्याच्या सूचना केल्या.