For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून जनतेला ‘गॅरंटी’! विकसित भारताची पायाभरणी करणार

06:45 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदी यांच्याकडून जनतेला ‘गॅरंटी’  विकसित भारताची पायाभरणी करणार
Advertisement

, राष्ट्रपती अभिभाषण चर्चेत विरोधकांची चिरफाड, दक्षिण-उत्तर वाद निर्माण न करण्याचा कर्नाटक सरकारला इशारा 

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘आमचा तिसरा कार्यकाळ आता नजीकच असून पुढील पाच वर्षांच्या कालखंडात विकसित भारताचा भरभक्कम पाया घातला जाणार आहे. आमच्या सरकारची ही संपूर्ण देशाला ‘गॅरंटी’ आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही जितकी कामे करुन दाखविली, तितकी त्यापूर्वीच्या अनेक दशकांमध्ये झाली नव्हती. देशाचा आणि देशातील प्रत्येकाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून या ध्येयाच्या पूर्तीसाठी सर्वार्थाने प्रयत्न करु, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केले आहे. विकसित भारताचे चित्रच त्यांनी या भाषणात लोकांसमोर ठेवताना विरोधकांच्या प्रत्येक आरोपाची सप्रमाण चिरफाडही केली आहे. विरोधकांकडून उत्तर-दक्षिण अशा वादाला खतपाणी घातले जात आहे. कर्नाटक सरकार तशा जाहिराती देऊन अत्यंत घातक वातावरणनिर्मिती करीत आहे. त्यांनी असे करु नये. अशाने त्यांचीही मोठी हानी होईल, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

सोमवारी त्यांनी लोकसभेत याच चर्चेला उत्तर देताना ‘भारतीय जनता पक्ष 370, तर रालोआ 400 पार’चा नारा दिला होता. बुधवारी राज्यसभेत भाषण करताना त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये केलेली प्रगती आणि पुढील पाच वर्षांमध्ये आपले सरकार करणार असलेली कामे, यांची प्रभावी मांडणी सादर केली आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये...

पुढील पाच वर्षांमध्ये आमचे सरकार गरीबांसाठी मोठ्या प्रमाणात घरे निर्माण करण्याची योजना हाती घेणार आहे. तसेच संपूर्ण देशाला पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा, बुलेट ट्रेन प्रकल्पाची पूर्तता, भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनविणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती, स्वच्छ ऊर्जा योजनेच्या अंतर्गत हरित हैड्रोजन निर्मितीत पुढाकार, कृषी क्षेत्राची भरभराट, पशुपालन क्षेत्राचा विकास, पर्यटन विकास आणि आरोग्य सेवेचा मोठ्या प्रमाणात विस्तार इत्यादी प्रकल्प साकारले जातील, असे प्रतिपादन त्यांनी केले.

खाद्यतेलात आत्मनिर्भरता

आज आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करावे लागते. मात्र, येत्या पाच वर्षांमध्ये खाद्यतेलाच्या उत्पादनात देश आत्मनिर्भर होणार आहे. या आत्मनिर्भरतेचा प्रारंभ आम्ही गेल्या 10 वर्षांमध्ये केला आहे. यामुळे देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात वाचणार असून वाजवी भावात खाद्यतेलाची उपलब्धताही साध्य होणार आहे, असा विश्वास त्यांनी भाषणात व्यक्त केला.

मनमोहनसिंगांची इच्छा केली पूर्ण

गेल्या 10 वर्षांमध्ये देशात प्रचंड प्रमाणात विकास झाला आहेत. तथापि, विरोधक खोटी आकडेवारी प्रसृत करुन नकारात्मक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा सत्तास्वार्थ त्यांना असे करण्यास भाग पाडत आहे. मागच्या मनमोहनसिंग सरकारच्या काळात देश धोरणलकव्याचा बळी ठरला होता. त्यामुळे विकासाची केवळ चर्चा होत राहील पण प्रत्यक्षात नगण्य प्रमाणात कामे झाली. आमच्या सरकारने त्या काळातील चर्चेचे प्रत्यक्ष कार्यात रुपांतर करुन दाखविले आहे. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वस्तू-सेवा कराची प्रणाली (जीएसटी) लागू करणे आवश्यक आहे, असे काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी लोकसभेत स्पष्ट केले होते. आज आम्ही ही प्रणाली लागू करुन त्यांची इच्छा पूर्ण केली, अशी खोचक टिप्पणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केली.

नेहरुंपासून मनमोहनसिंगांपर्यंत...

काँग्रेसची नकारात्मक विचारसरणी आजची आहे असे नाही. ती फार पूर्वीच्या काळापासून आहे. या देशाच्या सामर्थ्यावर कधीही काँग्रेसचा विश्वास नव्हता. त्यामुळे या पक्षाने इतकी वर्षे सत्ता हाती राहूनही देशाला आत्मनिर्भर बनविण्याचे किंवा त्याचा आत्मसन्मान जागृत करण्याचे प्रयत्न केलेच नाहीत. त्यामुळे देशाची आर्थिक वाढ खुंटली होती. पण आमचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही विकासाची गती वाढविण्यात यश मिळविले आहे. मागच्या काळातील मंदगती विकासाचे दिवस आता मागे पडले आहेत. त्यामुळेच पुढील दोन दशकांमध्ये भारत विकसित देश होण्यासाठी सज्ज झाला असून आता त्याला कोणी रोखू शकणार नाही. जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेवर येत आहोत. आमची वाटचाल स्पष्ट आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मागसवर्गीयांसंदर्भातील आरोपांना प्रत्युत्तर

देशाच्या प्रशासनात मागासवर्गियांचा वाटा किती, असा प्रश्न आज काँग्रेसकडून विचारला जात आहे. तथापि, काँग्रेस स्वत:च या स्थितीला जबाबदार आहे, ही बाब तो पक्ष लोकांपासून लपवत आहे. देशाचे प्रथम पंतप्रधान नेहरु यांनी त्यावेळी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले होते. ‘मला सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे मुळीच मान्य नाही. यामुळे प्रशासकीय सेवेचा दर्जा घसरतो. माझा आरक्षणाला विरोध आहे,’ अशी भाषा नेहरुंनी केली होती. आजही काँग्रेसची विचारसरणी हीच आहे. म्हणूनच त्या पक्षाने इतकी दशके सत्ता हाती असूनही दलित किंवा मागसवर्गिय यांना प्रशासनात जबाबदारीची पदे दिली नाहीत. आज हाच पक्ष आम्हाला जाब विचारत आहे हा मोठा विनोद आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. आंबेडकर नसते तर...

काँग्रेसचा कधीच दलित किंवा मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मनापासून पाठिंबा नव्हता, हे नेहरुंच्या या पत्रावरुन आणि काँग्रेसच्या नंतरच्याही धोरणांवरुन स्पष्ट होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जर नसते, तर दलित किंवा इतरांना आरक्षणही मिळाले नसते, हे काँग्रेसच्या या प्रारंभापासूनच्या धोरणावरुन सिद्ध होते. आमच्या सरकारने आरक्षणाचे धोरण प्रभावीपणे पुढे नेले असून त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. आम्ही सवर्ण वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही 10 टक्के आरक्षण दिले असून त्याला सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली आहे, असे प्रतिपादन करुन त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

महागाईसंबंधी काँग्रेसची दांभिकता

महागाई संदर्भात आज काँग्रेसने गळा काढला आहे. तथापि, याच पक्षाच्या मनमोहनसिंह सरकारच्या काळात महागाईने कळस गाठला होता. प्रत्यक्ष मनमोहनसिंह यांनीच लोकसभेत भाषण करताना ही बाब मान्य केली आहे, असे स्पष्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंह यांच्या भाषणातील उतारे वाचून दाखविले. मनमोहनसिंह यांच्या काळात कशा प्रकारे महागाई वाढली होती, अर्थव्यवस्था मंदावली होती, वित्तीय तूट आवाक्याबाहेर गेली होती, हे त्यांच्याच भाषणातून कसे स्पष्ट झाले होते, याची उदाहरणे त्यांनी भाषणात दिली.

सार्वजनिक उद्योग केले बळकट

आमचे सरकार सार्वजनिक उद्योग विकून टाकत आहे, असा धडधडीत खोटा आरोप काँग्रेस करीत आहे. तथापि आमच्या काळात सार्वजनिक उद्योगांची संख्या 520 वरुन 575 पर्यंत वाढली आहे. काँग्रेसच्या काळात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सार्वजनिक उद्योगांची दुर्दशा झाली होती. आज बीएसएनएल 4 जी आणि 5 जी सेवा पुरविण्यात अव्वल कंपनी बनली आहे. ही कंपनी आज मोठा लाभ कमावत आहे. हा आमच्याच धोरणांचा परिणाम आहे, ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकडेवारी सादर करुन त्यांच्या भाषणात स्पष्ट केली आहे. सार्वजनिक उद्योगांमध्ये 2014 मध्ये केवळ 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होती तर एकंदर नफा केवळ 1.25 लाख कोटींचा होता. आज ही गुंतवणूक 17 लाख कोटींवर गेली असून नफा 3 लाख कोटींपर्यंत पोहचला आहे. एलआयसीची वाट लावण्याचे काम आमच्या सरकारने केले, असा काँग्रेसचा आरोप आहे. पण आज एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी वित्तकंपनी असून आमच्या कार्यकाळात तिच्या भांडवलात आणि लाभात मोठी वाढ झाली आहे हे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे आपल्याच खोट्या आरोपांच्या जंजाळात काँग्रेस अडकली आहे. तिचे पितळ उघडे पडले असून तिचे हसे होत आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

युवराजांचा स्टार्टअप

‘सध्या काँग्रेसने आपल्या ‘युवराजां’ना एक स्टार्टअप उद्योग काढून दिला आहे. मात्र, या उद्योगाचे वैशिष्ट्या असे की तो स्टार्ट होण्याआधीच बंद पडला आहे. तो कधी ‘लाँच’ होऊ शकलाच नाही. काँग्रेसने आपली सर्व शक्ती पणाला लावूनही हा उद्योग अद्याप चाचपडणाऱ्या अवस्थेतच आहे, अशी खोचक टीका त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या सध्या होत असलेल्या यात्रेसंदर्भात केली.

देश तोडण्याचे काम काँग्रेसचेच

भारतीय जनता पक्ष देशात दुफळी माजवत आहे, अशी भाषा काँग्रेस करत आहे. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वत: काँग्रेसच धर्म, जात आणि भाषा यांच्या आधारावर देशात दुफळी अनेक दशकांपासून निर्माण करीत आहे. स्वातंत्र्य मिळतानाच देशाचे धर्माच्या आधारावर तुकडे करण्यात काँग्रेसही सहभागी होती. नंतरच्या काळातही याच तीन मुद्द्यांवर काँग्रेसने देशात गोंधळ माजविला आहे. काँग्रेसचे सत्ताकारण याच तीन मुद्द्यांवर अवलंबून आहे. आज हीच काँग्रेस आम्हाला उलटून विचारत आहे, हे आश्चर्यकारक आहे. आम्ही सबका साथ सबका विकास या मुद्द्यावर देशाची बांधणी करीत आहोत. आम्हाला जाब विचारण्याचा काँग्रेसला अधिकार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

मल्लिकार्जुन खर्गे यांचे आभार

राज्यसभेत अभिभाषणावर चर्चा करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पक्ष 400 जागांची भाषा करीत आहे, असे विधान केले होते. याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लक्ष्य केले. खर्गे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आमच्या पक्षाला 400 जागा मिळतील असा आशीर्वाद दिला आहे. आम्ही तो सहर्ष स्वीकारत आहोत. त्यांचे आशीर्वाद निश्चितच फळाला येणार आहेत. तो दिवस आता अधिक दूर नाही, अशी टिप्पणी त्यांनी केली.

Advertisement
Tags :

.