गॅरंटी योजना सुरुच राहणार!
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्पष्टीकरण : बेंगळूरमध्ये स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात सहभागी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात जारी करण्यात आलेल्या गॅरंटी योजना सुरूच राहतील, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गॅरंटी योजनांवर फेरविचार, चर्चा आणि गोंधळावर पडदा टाकला. विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाच गॅरंटी योजना राबवून राज्यातील जनतेच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता आणण्याचे काम राज्य सरकार करत आहे. या योजना यापुढेही सुरुच राहतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
बेंगळूरमधील माणिक शॉ परेड मैदानावर गुरुवारी 87 व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात ध्वजारोहण करून ते बोलत होते. गृहज्योती, गृहलक्ष्मी, अन्नभाग्य, शक्ती आणि युवानिधी योजनांमुळे राज्याचे दिवाळे निघतील, असे भाकित करणाऱ्यांना आम्ही उत्तर दिले आहे. राज्य सरकारच्या लोककल्याण योजना पाच गॅरंटी योजनांपुरत्याच मर्यादित नाहीत. समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी विविध योजनांतर्गत 13,027 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राज्य सरकार सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेला विशेष प्राधान्य देऊन राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी परिश्रम घेत आहे. गरजू कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी जागतिक मूळ उत्पन्न ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. ही बाब अभिमानास्पद आहे, असेही ते म्हणाले.
शकती योजनेंतर्गत 270 कोटी महिलांना मोफत बसप्रवासाचा लाभ मिळविला आहे. अन्नभाग्य योजनेंतर्गत अतिरिक्त तांदूळ देण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य केलेले नसताना देखील राज्य सरकारने तांदळाच्या मोबदल्यात तितकीच रक्कम लाभार्थींच्या खात्यावर जमा केली. आतापर्यंत तांदळाच्या मोबदल्यात 1.6 कोटी बीपीएल रेशनकार्डधारक कुटुंबांना 7,763 कोटी रु. दिले आहेत. गृहज्योती योजनेंतर्गत 1.60 कोटी कुटुंबांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळत असून या योजनेसाठी 8,844 कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. युवानिधी योजनेंतर्गत बेरोजगारांसाठी आतापर्यंत 91 कोटी रु. देण्यात आले आहेत, अशी माहिती सिद्धरामय्या यांनी दिली.