‘जीएसटी : रियल इस्टेट’ मंत्रीगटाची बैठक सुरू
पणजी : जीएसटी मंडळांतर्गत रियल इस्टेटसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटाची बैठक गोव्यात सुरू झाली असून ती दोन दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्या मंत्रीगटाचे निमंत्रक असून गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिजने विविध शिफारशींचे एक निवेदन या मंत्रीगटास सादर केले आहे. बांधकाम क्षेत्रातील डेव्हलपर्सवरील कराचे ओझे कमी करावे, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्रातील विविध सेवांसाठीचे कर कमी झाले पाहिजेत असेही निवेदनातून सूचवण्यात आले आहे. हॉटेल्स, होम स्टे, वेअरहाऊसिंग सेवा यांनाही त्या कर सवलतींचा लाभ मिळू शकेल असेही निवेदनातून म्हटले आहे. काल मंगळवारी ती बैठक सुरू झाली असून आज बुधवारी तिचा समारोप होणार आहे.
राज्यांच्या वित्तमंत्र्यांचा सहभाग
बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, महाराष्ट्र महिला बालविकासमंत्री अदिती तटकरे, गुजरातचे वित्तमंत्री कानुभाई मोहनलाल देसाई, केरळचे वित्तमंत्री के. एन. बालगोपाळ, पंजाबचे वित्तमंत्री हरपाल सिंग, उत्तर प्रदेश वित्तमंत्री सुरेश कुमार खन्ना हे त्या मंत्रीगटाच्या बैठकीत सहभागी झाले आहेत. राजधानी पणजीत ही बैठक घेण्यात आली. बैठकीचा अहवाल जीएसटी मंडळाला सादर करण्यात येणार असून त्यात विविध शिफारशी केल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावर मग केंद्र सरकार निर्णय घेणार आहे.