जीएसटी : कही खुशी, कही गम!
व्यापाऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया : ग्राहकांमध्ये फार औत्सुक्य नाही
पणजी : गत महिन्यात दि. 22 पासून देशभरात सुधारित जीएसटी लागू करण्यात आली. त्यात तब्बल 395 वस्तुंवरील जीएसटी दरात मोठी कपात करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष ग्राहकांमध्ये मात्र याबद्दल फार मोठे औत्सुक्य किंवा आनंद झाल्याचे दिसून आलेले नाही. तोच प्रकार व्यापारीवर्गामध्येही जाणवला त्यांच्याकडून संमिश्र अशाच प्रतिक्रिया ऐकू आल्या आहेत.जीएसटी दरात कपात झाल्यामुळे अनेक वस्तु स्वस्त होतील व त्याचा लाभ थेट अंतिम ग्राहकाला मिळेल, अशी जाहिरातबाजी सरकारकडून करण्यात येत आहे. व्यापारीवर्गाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले, खास करून अमेरिकेने वाढविलेल्या शुल्कानंतर केंद्र सरकारने जीएसटी दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला. ही कौतुकास्पद कामगिरी आहे. त्यातून स्थानिक बाजारपेठेला पाठिंबा मिळणार असल्याच्या प्रतिक्रिया काही प्रमुख व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. तरीही अद्याप काही किरकोळ चुका राहिल्या असून त्याचा फारसा परिणाम बाजारपेठेवर होणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.जीएसटी कमी करुन 14 दिवस उलटून गेले तरीही बाजारपेठेवर फरक दिसून येत नाही.
पणजीतील एका व्यापाऱ्याने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलताना, या सुधारणांमागील हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वप्रथम याच सरकारने अवाजवी जीएसटी लादून नागरिकांचे कंबरडे मोडले आणि आता ती कमी करून बचत उत्सव साजरे करण्यात काय अर्थ आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मडगाव येथील एका व्यापाऱ्याने बोलताना या निर्णयावर निराशा व्यक्त केली, जीएसटी दरांमध्ये अधिक लक्षणीय कपात व्हायला हवी होती. ती पाच टक्क्यांपर्यंत खाली आणली म्हणून फार मोठा फायदा होत नाही. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही प्रचंड जीएसटी भरत आहोत. त्यामुळे मोठी आर्थिक नुकसानी झालेली आहे. त्याशिवाय मॉल संस्कृती आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांच्या स्पर्धेत आम्हाला ग्राहकच मिळेनासे झालेले आहेत. त्यामुळे ही कपात आमच्यासाठी फार मोठी फायदेशीर आहे, असा भाग नाही, असे ते म्हणाले.
व्यापारी वर्गात संमिश्र प्रतिक्रिया
तथापि पणजीतील काही व्यापाऱ्यांनी मात्र या निर्णयाचे स्वागत केले. हे एक चांगले पाऊल व स्वागतार्ह पाऊल असल्याचे ते म्हणाले. वीज उपकरणे आणि साहित्य विक्री व्यवसायातील एका एका व्यापाऱ्याने तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘नवीन जीएसटीमुळे उत्पादने, उपकरणांच्या किंमती कमी करण्यास सांगण्यात येत असले तरी आम्ही आधीच अनेक उत्पादने त्यांच्या मूळ किंमतीपेक्षा कितीतरी कमी किंमतीत विकत आहोत, असे ते म्हणाले. एवढे असुनही हीच उत्पादने ऑनलाईन व्यवसायाच्या माध्यमातून सहजतेने आणि स्वस्त उपलब्ध असल्याने ग्राहक त्यांनाच जास्त पसंती देतात. परिणामी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना, ही करसुधारणा म्हणजे एक अतिशय चांगले पाऊल असल्याचे सांगितले. त्यातून व्यापार वाढेल व विकासालाही चालना मिळेल. तसेच मागणीतही वाढ होऊन आर्थिक उलाढाल वाढेल, असे ते म्हणाले. तथापि, या सर्वांचा लाभ ग्राहकांना मिळतील याची व्यवस्था करून सरकारने तसा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण करायला हवा, असेही ते म्हणाले.