जीएसटीतून फसवणूक करणाऱ्या ‘त्या’ संशयिताचा जामीन अर्ज फेटाळला
आठवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दिला दणका : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जीएसटी भरताना बनावट बिलाद्वारे सरकारची जीएसटी बुडवणाऱ्या ठगाला केंद्रीय आयकर व उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला असता 1 कोटी रुपये अनामत रक्कम ठेवल्यानंतरच जामीन देऊ, असे सुनावले होते. त्यानंतर पुन्हा त्याने जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असता त्याचा अर्ज फेटाळला आहे. यामुळे त्याला मोठा दणका बसला आहे.
नकीब नजीब मुल्ला (वय 25) रा. पाचवा क्रॉस, आझमनगर असे त्या संशयिताचे नाव आहे. नकीब हा आयकर सल्लागार तसेच फेडरल लॉजिस्टीक अँड कंपनीचा संचालक आहे. तो अनेक संस्थांचे जीएसटी तसेच आयटी रिटर्न्स भरण्याचे काम करत होता. जीएसटी भरल्यानंतर संबंधित संस्थांना मूळ पावत्या देताना त्यामध्ये फेरफार करत होता. त्यामुळे मूळ कंपन्यांची फसवणूक देखील त्याने केली आहे.
23.82 कोटींचा गोलमाल केल्याचा आरोप
केंद्रीय आयकर आणि उत्पादन शुल्क विभागाचे जवळपास 23.82 कोटी रुपयांचा गोलमाल केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. केंद्रीय आयकर व उत्पादन शुल्क विभागाने त्याच्यावर सेक्शन 69 सीजीएसटी अॅक्ट-2017 अंतर्गत 132 (1)(बी) आणि 132 (1)(सी) अन्वये गुन्हा दाखल केला होता. प्रारंभी जेएमएफसी द्वितीय न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्या ठिकाणी केंद्रीय आयकर व उत्पादन शुल्क विभागाचे सल्लागार वकील मुरगेश मरडी याने त्याने केलेल्या घोटाळ्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाला जामीन द्या, मात्र किमान एक कोटी रुपयांची रक्कम अनामत ठेवा, अशी विनंती कोर्टाकडे केली. न्यायालयाने ती ग्राह्या धरली आणि जामीन अर्ज फेटाळला.
संशयिताचा कारागृहातील मुक्कामात वाढ
त्यानंतर नकीब याने पुन्हा त्याच न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तोही फेटाळला. यामुळे आठवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्या न्यायालयानेही तो अर्ज फेटाळून लावला. जेएमएफसी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे त्या संशयिताचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. केंद्रीय आयकर व उत्पादन शुल्क विभागाचे सल्लागार मुरगेश मरडी, त्यांचे साहाय्यक अॅड. इरण्णा पुजेरी, अॅड. एस. एन. पोतदार यांनी देखील काम पाहिले आहे.