जीएसएस कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा 28 रोजी महामेळावा
बेळगाव : जीएसएस महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दि. 28 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या खुल्या रंगमंचावर ‘सक्सेरियन्स 24 रीकनेक्ट अॅण्ड रीजॉईस’ हा पुनर्मिलन महामेळावा आयोजित केला आहे. या महामेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व ज्येष्ठ कलाकार प्रसाद पंडित, माजी विद्यार्थी व खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी व एसकेई सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत. या महामेळाव्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याची अखेरची मुदत 25 डिसेंबर आहे. या महामेळाव्यात महाविद्यालयाच्या पहिल्या बॅचपासूनचे माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. 800 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
महामेळावा समिती सोहळ्याचे नियोजन करत असून विविध माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. महामेळावा अविस्मरणीय व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विविध समित्या स्थापन करून जबाबदाऱ्या पार पाडल्या जात आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी केली जात असून अधिकाधिक विद्यार्थी त्यात सहभाग नोंदवत आहेत. 28 रोजी नोंदणी करणाऱ्यांना एक हजार ऊपये नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. बेळगावबाहेर राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनाही महामेळाव्यात सहभागी होता यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.अधिक माहितीसाठी khandekar@gsWgm.edu.in या ईमेलवर किंवा 9844922496 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समितीने केले आहे. जीएसएस कॉलेजचे विद्यमान प्राचार्य अरविंद हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा. भरत तोपिनकट्टी, उपाध्यक्ष अनंत लाड, सचिव प्रा. संदीप देशपांडे, महामेळावा समितीचे अध्यक्ष कुलदीप हंगिरगेकर, प्रा. अभय सामंत, महामेळावा समितीचे सचिव प्रा. अनिल खांडेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
28 डिसेंबर रोजी होणारे दिवसभरातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
- सकाळी 10 ते 11 : नोंदणी
- सकाळी 11 ते 12 : उद्घाटन व सन्मान सोहळा
- दुपारी 12 ते 2.30 : पुनर्मिलन व जुन्या आठवणींना उजाळा
- दुपारी 2.30 ते 3.30 : स्नेहभोजन व समूह छायाचित्र
- दुपारी 3.30 नंतर : सांस्कृतिक कार्यक्रम