जी.एस.दिल्ली एसीस आघाडीवर
वृत्तसंस्था/अहमदाबाद
येथे सुरू असलेल्या सातव्या टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी जी. एस. दिल्ली एसीस संघाने आघाडीचे स्थान मिळविले आहे. राजस्थान रेंजर्स दुसऱ्या स्थानावर आहे. सदर स्पर्धा गुजरात विद्यापीठाच्या टेनिस स्टेडियममध्ये खेळविली जात आहे. दिल्ली एसीस आणि चेन्नई स्मॅशर्स यांच्यातील सामन्यात महिला एकेरीच्या पहिल्या लढतीत सोफीया कोस्टुलासने इरीना बाराचा 17-8 असा पराभव करत विजय नोंदविला. त्यानंतर सोफीयाने एन. जीवन समवेत मिश्र दुहेरीच्या सामन्यात चेन्नई स्मॅशर्सच्या इरीना बारा व ऋत्विक बोलीपल्ली यांचा 16-9 असा पराभव केला.
त्यानंतर पुरूष एकेरीच्या सामन्यात चेन्नई स्मॅशर्सच्या दालिबोर सिव्हेरसीनाने बिली हॅरीसचा 13-12 असा पराभव केला. पुरूष दुहेरीच्या सामन्यात सिव्हेरसीना आणि बोलीपल्ली यांनी पुरूष दुहेरीचा सामना जिंकून जी. एस. दिल्ली संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. जी. एस. दिल्ली एसीसी संघाने चेन्नई स्मॅशर्सचा 56-44 असा पराभव करुन आपल्या मोहीमेला विजयी सलामीने प्रारंभ केला. या स्पर्धेतील गुरूवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या दुसऱ्या लढतीमध्ये यश मुंबई इगल्सने एस.जी. पायपर्स बेंगळूरचा 51-49 अशा गुणांनी पराभव केला. शेवटच्या लढतीमध्ये हैदराबाद स्टायकर्सने गुजरात पँथर्सचा 51-49 अशा गुणांनी पराभव करत विजय नोंदविला. राजस्थान रेंजर्स संघाने गुरूगांवचा 55-45 अशा गुणांनी पराभव केला.