गृहलक्ष्मी बँक, सहकारी संघांमध्ये ‘नर्ल्म’च्या महिलांना प्राधान्य द्या
बेळगाव : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहलक्ष्मी योजनेंतर्गतच्या गृहलक्ष्मी बँक व सहकारी संघांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवनोपाय अभियान (नर्ल्म) योजनेच्या महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशीं मागणी नर्ल्म जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नर्ल्मच्या जिल्हाध्यक्षा गंगुबाई मादर यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी (दि. 26) देण्यात आले. राज्यात गृहलक्ष्मी योजनेमुळे महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. ग्रामीण भागात नर्ल्म योजनेंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरील महिला कर्मचाऱ्यांना गृहलक्ष्मी बँक तसेच सहकारी संघांमध्ये स्थान दिल्यास ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नत्तीला प्रोत्साहन मिळेल. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण महिलांच्या कल्याणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना नर्ल्म जिल्हा शाखेच्या पदाधिकारी व सदस्या उपस्थित होत्या.