For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेडहल्ला

06:58 AM Mar 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमृतसरमध्ये मंदिरावर ग्रेनेडहल्ला
Advertisement

स्फोट घडवण्याचा प्रयत्न : ‘आयएसआय’चा सहभाग असल्याचा संशय, बिहारमधून तीन संशयितांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ अमृतसर

अमृतसरमधील खंडवाला परिसर शनिवारी पहाटे स्फोटाने हादरला. मंदिरात ग्रेनेडफेक करून घडवण्यात आलेल्या स्फोटात आजूबाजूच्या भिंतींचे नुकसान झाले. तसेच खिडक्यांच्या काचाही फुटल्या. पहाटे झालेल्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी स्थानिक लोकांमध्ये घबराट पसरली आहे. या स्फोटात पाकिस्तानच्या आयएसआय दहशतवादी गटाचा समावेश असू शकतो, असा संशय पंजाब पोलिसांना आहे. ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तिघे तरुण नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना बिहारमधून त्यांना अटक करण्यात आली. हे आरोपी शस्त्रs आणि ग्रेनेड पुरवण्यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Advertisement

 

अमृतसरच्या खंडवाला परिसरातील ठाकुरद्वारा मंदिरात स्फोट झाला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी मंदिरावर ग्रेनेड फेकून हल्ला केला. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये हल्ला स्पष्टपणे दिसत आहे. पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंह भुल्लर यांनी या हल्ल्यांमागे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्हीमध्ये दोन दुचाकीस्वार दिसले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. त्यांना लवकरच पकडले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर दिली. ‘आयएसआय’ ही पाकिस्तानी एजन्सी दररोज आपल्या हस्तकांद्वारे अशा गोष्टी करण्यास प्रवृत्त करत आहे. यापूर्वी घडलेल्या प्रकरणांमध्येही हे स्पष्ट झाले असून आयएसआय कमकुवत घटकांना लक्ष्य करत असल्याचे ते पुढे म्हणाले. तसेच कोणाच्याही प्रभावाखाली किंवा पैशाच्या लोभापोटी अशी दहशतवादी कृत्ये करू नका असा इशारा त्यांनी दिला आहे.

पंजाब सुरक्षित : मुख्यमंत्र्यांचा दावा

मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही या घटनेबाबत भाष्य केले आहे. पंजाबचे वातावरण बिघडवण्याचे अनेक प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून राज्य अशांत दिसेल. काही समाजकंटक असे कृत्य करत असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील. पोलिसांकडे असलेली संसाधने अद्ययावत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत पंजाब पूर्णपणे सुरक्षित आहे. पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे पाठवली जात आहेत. पाकिस्तानचे हे कारनामे यापूर्वीही झाले असून अशा घटनांवर पाळत ठेवली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू

पोलिसांनी सीसीटीव्ही ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात दोन्ही तरुण मोटारसायकलवरून आल्याचे दिसत असून त्यांच्या हातात झेंडाही होता. ते काही वेळ मंदिराबाहेर उभे राहिले आणि नंतर त्यांनी मंदिराच्या दिशेने काहीतरी फेकल्याचे दिसत आहे. संबंधित दुचाकीस्वार तेथून पळून जाताच मंदिरात मोठा स्फोट झाला. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मंदिराचे पुजारी बचावले

स्फोटावेळी मंदिराचे पुजारी मुरारीलाल शर्मा आतमध्ये झोपले होते, पण सुदैवाने ते थोडक्यात बचावले. रात्री त्यांनी चेहरता पोलीस स्टेशन गाठत घटनेची माहिती दिली. हल्लेखोरांनी पहिल्या मजल्यावर बॉम्ब फेकला. यामुळे मंदिराच्या पहिल्या मजल्याच्या बाहेरील भागाचे नुकसान झाले आहे. पोलीस आणि मंदिर व्यवस्थापनाने नुकसान झालेल्या भागावर हिरवा पडदा टाकला आहे. दुचाकीस्वारांनी कोणत्या प्रकारची बॉम्बसारखी वस्तू फेकली याचा तपास पोलीस करत आहेत.

मोठे खुलासे होण्याची शक्यता

गेल्या चार महिन्यात अमृतसर आणि गुरुदासपूरमधील पोलीस चौक्यांना लक्ष्य करून झालेल्या अनेक स्फोटांनंतर स्फोटाच्या या ताज्या घटनेने सुरक्षा यंत्रणांच्या चिंता आणखी वाढवल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी बिहारमधून तीन संशयित आरोपींना अटक केली असून त्यांना पंजाबमध्ये आणले जात आहे. बिहारमधून अटक केलेले तिघेही आरोपी ग्रेनेड पुरवत होते आणि त्यांच्या लपण्याच्या ठिकाणांची माहितीही मिळाली आहे. तिन्ही तरुणांना बिहारमधून नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली. आता त्यांची सखोल चौकशी केली जात असल्यामुळे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.