काश्मीरमध्ये चार जवानांना वीरमरण कठुआमध्ये लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड हल्ला-गोळीबार
लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर, जोरदार चकमक : दहशतवादी हल्ल्यात सहा जवान जखमी
वृत्तसंस्था/ श्रीनगर
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनाला टार्गेट केले. या हल्ल्यात चार जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे. तसेच अन्य सहाजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिल्यामुळे जोरदार चकमक सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू आहे.
कठुआच्या माचेडी भागात दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार करताच लष्करी जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिल्याने जोरदार चकमक झडली. हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवानांना आपला जीव गमवावा लागला. घटनेची माहिती मिळताच जम्मू रेंजचे डीआयजी सुनील गुप्ता जम्मूहून चकमकीच्या ठिकाणी रवाना झाले. जम्मूहून स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) एक पथकही घटनास्थळी पाठवण्यात आले होते.
लोही मल्हार ब्लॉकमधील माचेडी भागातील बदनोटा गावात ही घटना घडली. हा भाग भारतीय लष्कराच्या 9 कॉर्प्स अंतर्गत येतो. शोध सुरू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या भागात अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात लष्कराच्या वाहनावर झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी 4 मे रोजी पूंछमधील शाहसीतार भागात हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता.
लष्करी वाहनावर फेकले ग्रेनेड
दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान सुरुवातीला ग्रेनेड फेकून लष्कराच्या वाहनाला उडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर जवानांनीही प्रत्युत्तर दिले. यासोबतच अतिरिक्त सुरक्षा दलही पाठवण्यात आले आहे. भारतीय लष्करावरील हल्ला जिल्हा मुख्यालयापासून 120 किलोमीटर अंतरावर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ते 3 दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेडने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.
यापूर्वी, लष्कराने 24 तासांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत सहा दहशतवाद्यांना ठार केले होते. शनिवारी सुरू झालेल्या चकमकीत एका पॅरा-ट्रुपरसह दोन जवान हुतात्मा झाले, तर दुसरा सैनिक जखमी झाला. सीआरपीएफ, लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम सुरू केली तेव्हा मोदरगाम गावात चकमक झडली होती.
दहशतवादमुक्त भागातही हल्ले
जम्मूमधील दहशतवादमुक्त असलेल्या भागातही आता सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. 9 जून रोजी रायसी येथे भाविकांच्या बसवर झालेल्या हल्ल्यात नऊ जण ठार तर 33 जखमी झाले होते. 12 जून रोजी कठुआच्या हिरानगरमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. त्यानंतर 26 जून रोजी डोडा जिह्यात तीन दहशतवादी मारले गेले. तसेच दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराच्या कारवाईत सहा दहशतवादी ठार झाले आहेत. यादरम्यान दोन जवानही हुतात्मा झाले होते.