राष्ट्रपतींच्या नेतृत्वात बिरसांना अभिवादन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचे थोर स्वातंत्र्यसेनानी आणि बिहारचे सुपुत्र तसेच जनजातीय नेते भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली आहे. हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून परिचित आहे. बिरसा मुंडा यांना अभिवादन करण्यासाठी भारताची राजधानी दिल्ली येथे शुक्रवारी एका प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंग आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. दिल्लीप्रमाणेच देशात अनेक स्थानी शुक्रवारी बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संसद परिसरातील ‘प्रेरणा स्थळ’ येथे बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करुन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अभिवादन केले. या कार्यक्रमात वनवासी वाद्यवादनाचा कार्यक्रमही अंतर्भूत करण्यात आला होता. विविध वनवासी समाजांकडून वाजविली जाणारी पांरपरिक वाद्ये कार्यक्रमस्थळी आणण्यात आली होती. राष्ट्रपती मुर्मू यांनी ढोल आणि नगारे यांचे पारंपरिक पद्धतीने वादन केले. त्या स्वत: वनवासी समाजातील असल्याने त्यांना या वाद्यांचा उत्तम परिचय आहे. कार्यक्रम स्थळातून त्यांचे निर्गमन झाल्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि ओम बिर्ला इत्यादी नेत्यांनीही या वाद्यांच्या वादनाचा आनंद घेतला. बिरसा मुंडा यांची जयंती 2021 पासून जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जात आहे.
विविध राज्यांमध्ये अभिवादन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जनजातीय गौरव दिनानिमित्त बिरसा मुंडा यांना सन्मानपूर्वक अभिवादन केले. झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनीही बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला राजभवनात पुष्पार्पण केले. त्याचप्रमाणे बिहार, ओडिशा, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांमध्येही त्यांच्या कार्याच्या स्मरणार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कोण होते बिरसा मुंडा
बिरसा मुंडा यांचा जन्म 1875 मध्ये सध्याच्या झारखंड राज्यात झाला होता. त्यांचे बालपण वनवासी संस्कारांमध्ये व्यतीत झाले होते. तरुण वयात त्यांनी ब्रिटीशांविरोधात सशस्त्र संघर्ष करण्यासाठी वनवासी समाजांमध्ये जागृती करुन त्यांची मोठी संघटना निर्माण केली. या संघटनेने बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वात ब्रिटीश सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रचंड संघर्ष उभारला होता. ब्रिटीशांनी या संघटनेचा धसका घेतला होता. मात्र, अखेरीस बिरसा मुंडा ब्रिटीशांच्या हाती लागले आणि त्यांच्या वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी ब्रिटीश बंदीवासात अंत झाला. बिरसा मुंडा यांचा स्वातंत्र्यसंघर्ष हे स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासातील अविस्मरणीय पर्व मानले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश
बिरसा मुंडा यांना अभिवान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर आपला संदेश प्रसारित केला आहे. ‘मातृभूमीचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांच्या संरक्षणासाठी भगवान बिरसा मुंडा यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या 150 व्या जयंतीच्या पवित्र दिनी मी या महान योद्ध्याला विनम्र अभिवादन करतो’ अशा शब्दांमध्ये त्यांनी या संदेशात आपली भावना व्यक्त केली आहे.