अमेरिकेचे ‘आरोग्य’ सांभाळणार रॉबर्ट केनेडी ज्युनियर
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून घोषणा : व्हॅक्सिनचे कट्टर विरोधक
वेलिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचे पुतणे रॉबर्ट केनेडी हे देशाचे पुढील आरोग्यमंत्री असणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी या पदावर त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. परंतु या नियुक्तीसोबत केनेडी यांना विरोध देखील सुरू झाला आहे. अँटी व्हॅक्सिन अॅक्टिव्हिस्ट असलेले रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांना ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे. केनेडी यांना जगभरात व्हॅक्सिनचा कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाते. व्हॅक्सिनमुळे ऑटिज्म आणि अन्य आजार होण्याचा धोका असतो असे त्यांचे म्हणणे आहे.
कुठल्याही सरकारची सर्वात मोठी जबाबदारी स्वत:च्या नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा सुनिश्चित करणे असते. याप्रकरणी आरोग्य आणि मानव सेवा विभागाची अत्यंत मोठी भूमिका राहणार आहे. हा विभाग हे सुनिश्चित करणार आहे की, अमेरिकेच्या नागरिकांना केमिकल, किटकनाशक, औषधे आणि अन्नात मिसळल्या जाणाऱ्या अशा पदार्थांपासून सुरक्षा मिळावी, ज्यांच्यामुळे आमच्या देशात आरोग्यावरून एक मोठे संकट निर्माण झाले आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
रॉबर्ट केनेडी या विभागांमध्ये पुन्हा वैज्ञानिक संशोधनाचे नवे मापदंड प्रस्थापित करतील आणि पारदर्शकात आणतील, दीर्घकाळापासून चालत आलेल्या आजारांवर मात करत अमेरिकेला पुन्हा महान अन् तंदुरुस्त केले जाणार आहे. दीर्घकाळापासून फूड इंडस्ट्री आणि औषध कंपन्या अमेरिकेचे शोषण करत आहेत. या कंपन्या फसवणूक आणि दुष्प्रचाराद्वारे कमाई करत आहेत. परंतु आता आम्ही यावर अंकुश लावू असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
केनेडी यांच्या नियुक्तीला विरोध
अमेरिकेचे आरोग्यमंत्री म्हणून रॉबर्ट केनेडी यांच्या नियुक्तीच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्या व्यक्तीच्या विचारांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून धोकादायक मानले जाते, अशा व्यक्तीला ट्रम्प यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी दिली असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.