पोलंडमधील कोल्हापूर स्मारकाला पंतप्रधान मोदींकडून अभिवादन
वृत्तसंस्था/वॉर्सा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोलंड दौऱ्यादरम्यान तेथील कोल्हापूर स्मारकस्थळी भेट देत अभिवादन केले. नोव्हेंबर 2017 मध्ये उद्घाटन झालेल्या मॉन्टे पॅसिनो युद्ध स्मारकाजवळील वळिवडे-कोल्हापूर पॅम्पच्या स्मारक फलकावर त्यांनी श्र्रद्धांजली वाहिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जामनगरचे महाराज आणि कोल्हापूरचे छत्रपती यांनी पोलंडमधील हजारो निर्वासितांना आश्र्रय दिल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी गुड महाराजा स्क्वेअर, मॉन्टे पॅसिनो मेमोरियल आणि कोल्हापूर पॅमिली मेमोरियल यांना भेट देत अभिवादन केल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. या स्मारकांचा इतिहास पोलंड आणि भारताला एका खास पद्धतीने जोडतो. कोल्हापूर स्मारक हे मॉन्टे पॅसिनो मेमोरिअलच्या शेजारी बांधले आहे. कोल्हापुरातील एका गावाच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आले आहे.