For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साळगावात हरित ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणार

12:29 PM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
साळगावात हरित ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणार
Advertisement

साळगावचे आमदार केदार नाईक यांचे प्रतिपादन, नेरूल मायमावाडा येथे नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

Advertisement

वार्ताहर /कांदोळी

उत्तर गोव्यातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या श्रीपाद नाईक यांच्याकडे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, ही गोव्यासाठी आनंदाची बातमी आहे.साळगावात व राज्यात सौर ऊर्जा वापरात आणण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी विचारविनिमय करून हरित ऊर्जा वापरास प्रोत्साहन देणार असल्याचे साळगावचे आमदार केदार नाईक यांनी सांगितले.वीज खात्यातर्फे मायमावाडा नेरूल येथे उभारलेला नवीन वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन साळगावचे आमदार तथा औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष केदार नाईक यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, नेरूल सरपंच राजेश कळंगुटकर, माजी सरपंच सुदेश गोवेकर, दशरथ कळंगुटकर, पियादाद आल्मेदा, पंचसदस्य शिवानंद गोवेकर, संदेश गोवेकर, कनिष्ठ अभियंता प्रितेश सिनारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मरसाठी सुमारे 89 लाख ऊपये निधी मंजूर केला होता, अशी माहिती आमदार केदार नाईक यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, नेरूल मायमावाडा येथे गेल्या कित्येक वर्षापासून कमी दाबाच्या वीज पुरवठा होत असल्याने वीज उपकरणे निकामी होत होती. यामुळे वीज ट्रान्सफॉर्मरची उभारणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून सातत्याने होत होती. आता नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यन्वित करण्यात आल्याने ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाली आहे. या पंचायत क्षेत्रात वीस भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. गावातील वीजेची समस्या यशस्वीपणे सोडविण्यात आली आहे. साळगावातील नैसर्गिक झरीच्या पाण्याचे नियोजन करण्यावरही भर देणार आहे तसेच प्रलंबित विकासकामे लवकरच हाती घेणार, अशी माहिती केदार नाईक यांनी दिली. नेरूल मायमावाडा येथील ग्रामस्थांची कित्येक वर्षांची वीज पुरवठ्याची मागणी पूर्ण केल्याबद्दल सरपंच राजेश कळंगुटकर यांनी आमदार केदार नाईक यांचे आभार व्यक्त केले. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.