महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बद्रिकाश्रामाचे महात्म्य

06:30 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

उद्धवाला अगाध गती प्राप्त झाली. येथून पुढे त्याच्या हातून सर्व लोकांच्यावर उपकार करण्याच्या दृष्टीने कार्य होण्यासाठी त्याला ब्राह्मणाच्या शापापासून वाचवावे ह्या हेतूने भगवंतांनी स्वत:च उपाय करायचे ठरवले. उद्धवाला जरी ब्रह्मज्ञान झालेले असले तरी ब्राह्मणाचा शाप अतिदारुण असतो हे भगवंतांना माहित होते. यादवांनी ब्राह्मणांचा अपमान करून, स्वत:चा घात करून घेतला होता आणि उद्धवाचा जन्म यादवकुळात झालेला असल्याने त्यालाही यादवांना मिळालेला शाप लागू होणार होता. त्याला शापापासून दूर ठेवणे आवश्यकच होते. म्हणून त्याला येथून लांब बद्रिकाश्रमात पाठवणे भगवंतांना योग्य वाटले. बद्रिकाश्रम पावन होता. त्यामुळे तेथे तो जर गेला तर त्याला शाप भोवणार नाही हे लक्षात घेऊन भगवंतांनी हा निर्णय घेतला होता. विशेष सांगायचे म्हणजे त्याच्यात भगवंतांच्या अवतारात जी शक्ती असते त्यापेक्षा कितीतरी जास्त शक्ती आलेली होती. असे उद्धवासारखे अनर्घ्य रत्न वाचवलेच पाहिजे ह्या हेतूने भगवंतांनी त्याला बद्रिकाश्रमात पाठवायचे ठरवले. त्यादृष्टीने भगवंत गंभीर आवाजात म्हणाले, उद्धवा तुला ब्रह्मज्ञान झालेले आहे. त्यामुळे तुझे स्नेहपाश बंधन तुटले आहे म्हणून मी तुला आज्ञा देत आहे की, तू बद्रिकाश्रमात जा. मी असे सांगतो आहे त्यालाही काही विशेष कारण आहे तेही सांगतो. लोकसंग्रह करून जडमूढ जनांना तारण्यासाठी बद्रिकाश्रमासारखे दुसरे स्थान नाही कारण ते माझे स्थान आहे. तेथे माझे नित्य अनुष्ठान चालत असते. दुरून जरी त्या ठिकाणाकडे पाहिले तरी कलीकाळाचेसुद्धा निर्दालन होते मग इतरांची काय कथा? त्या पर्वताचा स्पर्श माणसाला परमपवित्र करून सोडतो. जो बद्रिचे नामस्मरण करतो त्याचे दारूण महादोष निर्दालीत होतात. माझ्या पायाला स्पर्श करून वाहणारी अलकनंदा ही अत्यंत पवित्र असून तिच्या केवळ स्पर्शाने लोक अलौकिक पवित्र होतात. अलकनंदा माझ्या पायांना स्पर्श करून पुढे येत असल्याने तिच्यात श्रद्धायुक्त अंत:करणाने स्नान केले तर जीवाचे भवबंधन म्हणजे संसाराचे बंधन तुटते. पूर्ण श्रद्धेने केलेल्या स्नानाने त्याच्या विचारसरणीत बदल होऊन आपण निरपेक्षपणे कर्मे करावीत असे त्याला वाटू लागते. अशी निरपेक्ष कर्मे करता करता त्याला माझ्या कृपेने त्याला आत्मज्ञान होते आणि त्याक्षणी त्याचे संसार बंधन संपुष्टात येते. जो त्या नदीतील पाण्याने आचमन करील त्याचे पितर उद्धरून जातात. म्हणून माझे बद्रिकाश्रम हे स्थान अत्यंत पवित्र आहे. आता तू कदाचित विचारशील की, हे स्थान तू का निवडलेस तर त्यालाही कारणे आहेत तीही तुला सांगतो. रजोगुणामुळे माणसे अत्यंत भोगासक्त झाली तेव्हा त्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी मी तेथे दोन रुपात अवतरलो. ज्याप्रमाणे दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र अंधार पूर्ण नाहीसा करतात त्याप्रमाणे लोकांच्या मानगुटीवर बसलेले रजोगुणाचे भूत उतरवण्यासाठी मी नर आणि नारायण ह्या दोन प्रकारात बद्रिकाचलात अवतरलो. त्यामुळे तेथे कायम रजोगुण निष्प्रभ होत राहिला. भक्तांना भजनपूजन करायला मी नारायण अवतार धारण केला तर नररूपाने मीच भक्ताचा अवतार घेतला. म्हणजे पूज्य आणि पूजक अशी दोन्ही रूपे मीच धारण केली. त्यातूनच भक्ती, वैराग्य आणि ज्ञान ह्या तिन्हीचे आचरण करून तेथे दिव्य प्रकाश निर्माण केला. अशा या बद्रिकाश्रमामध्ये मी अजूनही वरील तिन्ही गोष्टींचे अनुष्ठान करत असतो. नरनारायणस्थितीत मी ज्या पर्वतात अवतरलो. त्या पर्वतामध्ये बोरींचे वन फोफावले होते पण माझ्या अनुष्ठानामुळे ते नष्ट होऊन तेथे माझ्या भक्तीचे  नंदनवन फोफावले आहे म्हणून ह्या स्थळाला मी ‘बद्रिकाश्रम’ असे नाव ठेवले. त्या स्थळी माणसाला मी करता आहे आणि समोर दिसणारा संसार खरा आहे असा झालेला भ्रम नष्ट होतो.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article