इंग्लंड, नेदरलँड्स संघांचे शानदार विजय
युरो चषक फुटबॉल : डेन्मार्क-स्लोव्हेनिया लढत बरोबरीत
वृत्तसंस्था/ जेलसेनकिर्चेन, स्टुटगार्ट, हॅम्बुर्ग
जर्मनीत सुरु असलेल्या 2024 च्या युरोपीयन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात जूडे बेलिंगहॅमच्या निर्णायक गोलाच्या जोरावर इंग्लंडने सर्बियाचा 1-0 असा निसटता पराभव केला. तर अन्य एका सामन्यात नेदरलँड्सने पोलंडवर 2-1 अशी मात केली. डेन्मार्क आणि स्लोव्हेनिया यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत राहिला.
इंग्लंड आणि सर्बिया यांच्यातील क गटातील या सामन्यात दोन्ही संघांकडून दर्जेदार खेळाचे प्रदर्शन घडले. इंग्लंड आणि सर्बियाचे फुटबॉल समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने हिंसक घटना घडतील याबद्दल सामन्यापूर्वी चिंता व्यक्त करण्यात आली होती. पण पोलीसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. हा सामना पाहण्यासाठी दाखल झालेल्या दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये बाचाबाची झाली आणि परस्परांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण तंग झाले नाही. सामना सुरु झाल्यानंतर 13 व्या मिनिटाला रियल माद्रीद क्लबकडून खेळणाऱ्या जूडे बेलिंगहॅमने बुकायो साकाने दिलेल्या पासवर हेडरद्वारे अचूक गोल केला. सामन्यातील मध्यंतराला काही मिनिटे बाकी असताना इंग्लंडच्या हॅरी केनने सर्बियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारुन चेंडू गोलपोस्टमध्ये मारण्याचा प्रयत्न केला. पण सर्बियाच्या गोलरक्षकाने केनचा हा फटका अचूकपणे थोपविल्याने इंग्लंडला आपली आघाडी वाडविता आली नाही. प्रमुख आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमध्ये हॅरी केनने विक्रमी 23 व्या सामन्यात इंग्लंडचे प्रतिनिधीत्व केले आहे. या सामन्यातील विजयामुळे इंग्लंडने क गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. आता इंग्लंडचा या स्पर्धेतील पुढील सामना येत्या गुरुवारी डेन्मार्क बरोबर होत आहे.
सामना बरोबरीत
स्टुटगार्ट येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या क गटातील सामन्यात डेन्मार्कने स्लोव्हेनियाला 1-1 असे गोल बरोबरीत रोखले. डेन्मार्कच्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात ख्रिस्टेन एरिकसनने शानदार गोल करुन स्लोव्हेनियाला विजयापासून रोखले. 2021 साली या स्पर्धेत झालेल्या फिनलँड विरुद्धच्या सामन्यात खेळताना ख्रिस्टेन एरिकसनला हृदयविकाराचा झटका आल्याने तो मैदानावरच खाली कोसळला होता. या घटनेनंतर तब्बल 3 वर्षांनी एरिकसनचे फुटबॉलच्या मैदानावर पुनरागमन या सामन्यात झाले आहे.
या सामन्यातील 17 व्या मिनिटाला एरिकसनने आपल्या सहकाऱ्याकडून मिळालेल्या पासवर स्लोव्हेनियाच्या बचावफळीतील खेळाडूंना हुलकावणी देत हा गोल केला. सामन्याच्या मध्यांतरापर्यंत डेन्मार्कने स्लोव्हेनियावर 1-0 अशी आघाडी मिळवली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर स्लोव्हेनियाने आपल्या डावपेचात अधिक बदल केले. आणि त्याचा लाभ त्यांना 77 व्या मिनिटाला मिळाला. स्लोव्हेनियाच्या एरिक जेंझाने डेन्मार्कचा गोलरक्षक कास्परला हुलकावणी देत गेल नोंदविला. यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोल करण्याचा प्रयत्न केला पण बचावफळी आणि गोलरक्षकाच्या शानदार कामगिरीमुळे हा सामना अखेर 1-1 असा बरोबरीत राहिला. 32 वर्षीय एरिकसनने 2022 साली फुटबॉल क्षेत्रात पुनरागमन केले. युरोपीयन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत डेन्मार्कची कामगिरी दर्जेदार झाली असून यावेळी ते पुन्हा आपल्या कामगिरीने शौकिनांना खूष करतील अशी अपेक्षा आहे. 1992 साली डेन्मार्कने युरोपीयन चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर 2021 साली झालेल्या युरोपीयन चॅम्पियनशिप स्पर्धेत डेन्मार्कने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती. स्लोव्हेनियाचा संघ युरोचषक फुटबॉल स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची वाट पाहत आहे.
नेदरलँड्स विजयी
हॅमबूर्गमध्ये रविवारी झालेल्या ड गटातील सामन्यात नेदरलँड्सने पोलंडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे नेदरलँड्सने ड गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या सामन्यामध्ये पोलंडची भक्कम बचावफळी भेदण्यासाठी नेदरलँड्सला शेवटपर्यंत खूपच कठीण गेले. दरम्यान पोलंडने या सामन्यात गोल करण्याच्या किमान दोन सोप्या संधी वाया दवडल्या. हुकमी फुटबॉलपटू रॉबर्ट लिवेनडोव्हेस्कि या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याची उणीव पोलंडला शेवटपर्यंत भासली. त्याच्या जागी अॅडॅम बुकासाला खेळविण्यात आले. सामन्यातील 16 व्या मिनिटाला बुकासाने हेडरद्वारे पोलंडचे खाते उघडले. पोलंडने आघाडी घेतल्यानंतर नेदरलँड्सच्या खेळाडूंनी जलद खेळावर अधिक भर दिला आणि 32 व्या मिनिटाला कॉडी गॅकपोने नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. सामना संपण्यास केवळ काही मिनिटे बाकी असताना वेगहॉर्स्टने नेदरलँड्सचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदवून पोलंडचे आव्हान संपुष्टात आणले.
सामन्यांचे निकाल
इंग्लंड वि. वि. सर्बिया
1-0
डेन्मार्क - स्लोव्हेनिया
1-1
नेदरलँड्स वि. वि. पोलंड
2-1