‘रन फॉर पीस’ मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद
बेळगाव : बेळगाव पोलिसांच्या ‘रन फॉर पीस’ मॅरेथॉनमध्ये सहा हजारहून अधिक जणांनी भाग घेतला. रविवार दि. 9 मार्च रोजी सकाळी 6 वाजता सीपीएड मैदानावर मॅरेथॉनला चालना देण्यात आली. केवळ बेळगावच नव्हे तर महाराष्ट्र व गोव्यातून आलेल्या स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतनसिंग राठोड, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, डॉ. गिरीश सोनवलकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनला चालना देण्यात आली. 5 व 10 किलोमीटर अशा दोन गटात ही मॅरेथॉन झाली. अमली पदार्थमुक्त कर्नाटक व गुन्हेगारी थोपविण्यासाठी जागृतीचा एक भाग म्हणून रविवारी केवळ बेळगावच नव्हे तर संपूर्ण राज्यात पोलीस दलाच्यावतीने मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिक, लष्करी जवान व पोलीस अधिकारी व कर्मचारी, महिला विभागात मॅरेथॉन पूर्ण करून विजय मिळविलेल्यांचा गौरव करण्यात आला.