एसबीआयच्या लोन मेळाव्याला बेळगावकरांचा उत्तम प्रतिसाद
प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळीनिमित्त येथील भारतीय स्टेट बँकेच्यावतीने शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील मिलेनियन गार्डनमध्ये भव्य गृह व कार लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 19 ऑक्टोबर रोजी या लोन मेळ्याला चालना देण्यात आली.
रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा मेळावा असणार आहे. बुडा आयुक्त सी. डब्ल्यू. शकीरअहमद यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. एसबीआयने एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. बेळगावकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच त्यांनी बुडाच्या योजनांची माहिती दिली.
हुबळी उपमुख्य व्यवस्थापक पी. एल. श्रीनिवास राव, प्रादेशिक व्यवस्थापक विकास भागोत्र, मुख्य व्यवस्थापक जी. के. सहाय्यक, प्रादेशिक व्यवस्थापक जयकुमार यांच्यासह बँकेचे ज्येष्ठ अधिकारी, ग्राहक, शहरातील प्रमुख बिल्डर्स, कार विक्रेते या मेळाव्यात भाग घेतला होता. या मेळाव्याला पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला.
मेळाव्यात गृह व कार लोनसंबंधी माहिती घेऊन नागरिक कर्ज सुविधा घेत आहेत. आकर्षक व्याजदरातून कर्ज दिले जात असून गरीब व मध्यम वर्गीयांसाठी घर बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना-अर्बन 2.0 योजनेला प्राधान्य देण्यात येत आहे. पात्र लाभार्थींना कमीतकमी खर्चात घर बांधण्यासाठी कर्ज मिळणार आहे. बांधकामासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जाला 1 लाख 80 हजारपर्यंत सबसिडी दिली जाणार आहे.