तुकोबांच्या अभंगात मोठी ताकद
हभप श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर : रिंगण सोहळ्याने डोळ्यांचे पारणे फेडले : तुकोबा गाथा पारायणाची उत्साहात सांगता
बेळगाव : विश्वाच्या कल्याणासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी अभंग निर्माण केले. त्या अभंगात मोठी ताकद आहे. तुकोबांच्या प्रत्येक अभंगाची सुरुवात साक्षात विठ्ठलाच्या भक्तीने झाली आहे. अशा तुकोबांनी परमार्थासाठी त्याग केला आहे, असे विचार तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज श्रीक्षेत्र देहू हभप श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर यांनी व्यक्त केले. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्यांतर्गत तुकोबा अखंड गाथा पारायणाची रविवारी उत्साहात सांगता झाली. यावेळी ते कालाकीर्तनात बोलत होते. अनगोळ येथील एसकेई एज्युकेशन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानात 7 एप्रिलपासून गाथा पारायण सोहळा सुरू होता. मागील आठ दिवसांत या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार आणि कीर्तनकारांनी सेवा केली. रविवारी सांगता सोहळ्याला अनगोळसह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने वारकरी, भक्तांनी गर्दी केली होती. हभप श्रीगुरु पुंडलिक महाराज देहूकर पुढे म्हणाले, विश्वाच्या कल्याणासाठी संत-महात्म्यांनी स्वत:चा देह झिजविला आहे. त्या संत-महात्म्यांचे विचार, आदर्श अंगी बाणवले पाहिजेत. भगवंताशी जो एकरुप होतो त्याला संत म्हणतात.
डोळ्यांचे पारणे फेडणारा अश्वरिंगण सोहळा
तुकोबा अखंड गाथा पारायण सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमात रविवारी अश्वरिंगण सोहळा झाला. यामध्ये माऊलींच्या अश्वांनी डोळ्यांचे पारणे फेडले. विशेषत: रिंगण सोहळा पाहण्यासाठी अनगोळ, वडगाव, भाग्यनगर यासह शहर आणि ग्रामीण भागातील भाविक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.