For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदू धर्माची जागृती करण्यात खानापुरातील शेतकरी-वारकऱ्यांचे मोठे योगदान

10:36 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदू धर्माची जागृती करण्यात खानापुरातील शेतकरी वारकऱ्यांचे मोठे योगदान
Advertisement

भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्याकडून स्तुती : खानापुरात भाजपची प्रचार सभा

Advertisement

वार्ताहर /नंदगड

खानापूर तालुक्यातील जनतेचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. येथील शेतकरी व वारकऱ्यांनी हिंदू धर्माची जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत हिंदू धर्माची पताका फडकवत ठेवली असल्याचे प्रतिपादन कारवार लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी केले. खानापूर पाटील गार्डन येथे सोमवारी झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी कागेरी पुढे म्हणाले, राज्यातील काँग्रेस सरकार दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी असमर्थ ठरले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग विवंचनेत सापडला आहे. भाजपसारख्या विकासाभिमुख सरकारची आज राज्याला व देशाला गरज आहे. देशातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बेघर लोकांसाठी इंदिरा आवास योजना राबवली, कमी दरात औषधे मिळण्यासाठी जनऔषधी योजना, महिलांच्या डोळ्dयातले अश्रू थांबवण्यासाठी उज्ज्वल गॅस योजना, शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजनेद्वारे प्रतिवर्षी सहा हजार रुपये अशा अनेक योजना राबवून जनतेला दिलासा दिला आहे. खानापूरशी माझा गेल्या 30 वर्षांपासून जवळचा संबंध आहे. मराठी भाषा मला काही प्रमाणात अवगत आहे. मी खासदार झाल्यास खानापुरातील नदी-नाल्यांवर बंधारे बांधून पाणी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार असून पर्यटन व्यवसाय वाढीस लागणार आहे. स्थानिकांना रोजगाराबरोबरच येथील शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारभाव मिळवून देणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

Advertisement

येथील माजी सैनिक व क्रीडापटू यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. व्यासपीठावर आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, भाजपाचे खानापूर तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपा नेते प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, सुरेश देसाई, पंडित ओगले, जोतिबा रेमाणी, बाबुराव देसाई, निधर्मी जनता दलाचे नेते नासीर बागवान आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ बोलताना म्हणाले, खानापूर तालुका विकासापासून वंचित आहे. येथे अनेक नद्या वाहत आहेत. पाणी असून योजनेअभावी येथील लोकांना पाणी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. व मोदी यांनी अंमलात आणलेल्या अनेक योजनांचा आढावा यावेळी त्यांनी घेतला. आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, खानापूर तालुक्यातील अनेक लोक कामधंद्यानिमित्त परगावी राहतात. परंतु सणासुदीच्या व यात्रेच्या वेळी ते आपल्या गावाला येतात. आपल्या परंपरेनुसार सण-यात्रा साजरी करतात. त्यामुळेच खानापूर तालुक्यात आजपर्यंत हिंदू संस्कृती जिवंत आहे. येथील लोक हिंदू संस्कृती मानणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी आजपर्यंत खंबीरपणे उभे राहिले आहेत. यावेळी निजद नेते नासीर बागवान, भाजपाचे नेते प्रमोद कोचेरी, बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई, संजय कुबल यांनी विचार व्यक्त केले. खानापूर तालुक्याच्या विविध भागातून महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.