ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरेचा टेनिसला अलविदा!
यंदा एकेरी व दुहेरी प्रकारात होणार सहभागी : पॅरिस ऑलिम्पिक ठरणार शेवटची स्पर्धा
वृत्तसंस्था/ पॅरिस
ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरेने टेनिसला अलविदा केला आहे. 37 वर्षीय मरे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकेरी आणि दुहेरी प्रकारात सहभागी होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमधील टेनिस स्पर्धा ही माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल, अशी पोस्ट मरेने सोशल मीडियावर करत निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ऑलिम्पिकमध्ये एकेरीत दोन सुवर्णपदक जिंकणारा अँडी मरे हा पहिला खेळाडू आहे. त्याने 2008 मध्ये बीजिंगमध्ये पहिली ऑलिम्पिक स्पर्धा खेळली होती. पॅरिसमध्ये पोहोचताच मरेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ऑलिम्पिकनंतर व्यावसायिक टेनिसला अलविदा करणार असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. पॅरिसमध्ये मी माझ्या कारकिर्दीतील अखेरची टेनिस स्पर्धा खेळण्यासाठी आलो आहे. ऑलिम्पिकसाठी पॅरिसला पोहचणं, ग्रेट ब्रिटनसाठी खेळणं, हे निश्चितच माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. यंदाच्या स्पर्धेत पदक जिंकत शेवट गोड करण्याचा आपला प्रयत्न असेल.
ऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्ण जिंकणारा एकमेव खेळाडू
यंदाच्या स्पर्धेत मरे एकेरी आणि दुहेरी प्रकारात सहभागी होईल. त्याचे पाचवे ऑलिम्पिक असेल. मरेने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकलं होते. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याने स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररचा पराभव केला होता. यानंतर 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये मरेने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली होती. यावेळी त्याने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोचा पराभव केला होता. यासह, दोन ऑलिम्पिक एकेरी सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरला.
विशेष म्हणजे, अँडी मरेची गणना ब्रिटनच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट टेनिसपटूंमध्ये केली जाते. एकेकाळी टेनिसमध्ये रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या तिघांची मक्तेदारी होती. मरेने ही मक्तेदारी काहीअंशी मोडून काढण्यात यश मिळवले होते. त्याने 2012 मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम तर 2013 आणि 2016 मध्ये दोन विम्बल्डन ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकली आहेत. याशिवाय तो पुरुषांच्या एकेरी रॅकिंगमध्ये अव्वल स्थानीही राहिला आहे.
मी कारकिर्दीतील अखेरच्या ऑलिम्पिकला सामोरे जात आहे. मुळातच अशा मानाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होणे ही मोठी बाब आहे. यंदा ग्रेट ब्रिटनच्या ध्वजाखाली खेळताना पदक मिळवण्याचे लक्ष्य असेल.
अँडी मरे, टेनिसपटू ग्रेट ब्रिटन