अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी समस्या सोडविणार
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आश्वासन : मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय
बेंगळूर : 2011-12 या सालापासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी देण्यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेंगळूरच्या फ्रीडम पार्कवर 2011-12 या वर्षापासून निवृत्त झालेल्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ग्रॅच्युईटी द्यावी, अशी मागणी करत आंदोलन छेडले आहे. गुरुवारी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लवकरच शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्यात येईल, असे सांगितले. महिला आणि बालकल्याण खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे 2011 ऐवजी 2023 पासून निवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी लागू करण्यात आली आहे. हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल. अलीकडे 3 ते 4 वेळा अर्थखात्याशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही समस्या सोडविण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
19 रोजी बेंगळुरात अंगणवाड्यांचा सुवर्ण महोत्सव
कर्नाटकात अंगणवाड्या सुरू होऊन 50 वर्षे झाली आहेत. त्यामुळे 19 नोव्हेंबर रोजी बेंगळुरात अंगणवाड्यांचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले. याप्रसंगी महिला-बालकल्याण खात्याचे संचालक महेश बाबू, मंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी बी. एच. निश्चिल, कर्नाटक राज्य अंगणवाडी कर्मचारी महामंडळाचे अध्यक्ष. जी. आर. शिवशंकर, मुख्य सचिव एम. उमादेवी आदी उपस्थित होते.