For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द्राक्ष व्यापाऱ्याकडून दीड कोटींचा गंडा

04:18 PM Feb 27, 2025 IST | Radhika Patil
द्राक्ष व्यापाऱ्याकडून दीड कोटींचा गंडा
Advertisement

सांगली : 

Advertisement

द्राक्ष दलालांनी तासगाव, कवठेमहांकाळ व खानापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना दीड कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे. महादेव बाबासाहेब गडदे व त्याच्या अन्य दोन साथीदारांनी ही फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जरंडी, पळशी, घाटनांद्रे व परिसरातील दहापेक्षा अधिक द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून संशयित महादेव गडदे (रा. परभणी) व त्याच्या दोन साथीदारांनी गेल्या काही दिवसात द्राक्षे खरेदी केली. शेतकऱ्यांना काही रक्कम आगाऊ देत द्राक्षे खरेदी केली. खरेदी द्राक्षांचे उर्वरित पैसे देण्यासाठी या दलालांनी शेतकऱ्यांना बँकेचे धनादेश दिले होते. धनादेश मिळाल्याने शेतकरी निर्धास्त होते. एक-दोन दिवसात तुमचे राहिलेले पैसे देतो, असे दलालांनी सांगितल्याने शेतकरी पैशाच्या प्रतीक्षेत होते. मात्र दोन दिवसांपूर्वी संशयित तिघेही राहत्या ठिकाणाहून गायब झाल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले.

Advertisement

यावर्षीचा द्राक्ष हंगाम जोमात असल्याने मालाला चांगला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण असताना हंगामाच्या अंतिम टप्प्यात दलालांनी फसवणूक केल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. संशयित महादेव गडदे याचे दोन साथीदार उत्तरप्रदेश किंवा बिहारमधील असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यवहार करताना दलालांबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधिकारी आणि तहसीलदारांनी करूनही शेतकऱ्यांकडे या दलालांबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये लक्ष्मण शंकर यादव, बाळासाहेब मंडले, कृष्णा कारंडे, योगेश शिंदे, श्रीकांत ज्ञानदेव पवार, तानाजी शिवाजी शिंदे, शांताराम कांबळे, शिवाजी तुकाराम जाधव, संदीप बाळासो शिंदे, बापूसो साळुंखे, विजय साळुंखे, रावसाहेब शिंदे, विठ्ठल शिंदे, प्रवीण जयसिंग शिंदे, सुजित पंडित शिंदे, पवन बबन शिंदे, अरुण नानासो शिंदे, हर्षद नेताजी झांबरे, तानसिग वसंत झांबरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश आहे. फसवणूक झालेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • दहा लाख बुडाले आता कसं करू ?

घाटनांद्रे येथील शिवाजी शिंदे यांनी कर्ज काढून बागा जागवल्या. यंदा पहिल्यांदा चांगला दर मिळाला होता. मात्र व्यापाऱ्याने गंडा घातल्याने आता शिवाजी शिंदे यांच्या समोर कर्ज आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न  निर्माण झाला आहे, शिवाजी शिंदे यांचे दहा लाख रुपयांचे द्राक्षे आहेत. दहा लाख बुडाले आता कसं करू ? असा प्रश्न जाधव विचारत आहेत.

  • गडदे सराईत गुन्हेगार

व्यापारी महादेव बाबासाहेब गडदे, दीपक बाबासाहेब गडदे, सदाशिव बाबासाहेब गडदे यांनी यापूर्वी अशाच प्रकारे नाशिकसह इतर जिह्यात शेतकऱ्यांना फसवले असल्याची माहिती समोर येत आहे. दरवर्षी वेगळा जिल्हा आणि वेगळ्या ठिकाणी निवास करून ही टोळी फसवत असल्याचे शेतकऱ्यांना समजले आहे. त्यामुळे या सराईत व्यपाऱ्यांवर एमपीआयडी कायद्याने गुन्हा दाखल करण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

Advertisement
Tags :

.