द्राक्ष छाटणी लांबणीवर, वेळापत्रक कोलमडले
सोनी / गिरीश नलवडे :
सप्टेंबर महिन्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सोनी, भोसे, करोली (एम), पाटगाव आणि धुळगाव परिसरातील द्राक्षबागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे जमिनीत वाफसा नसल्याने यंदा द्राक्षबागांची छाटणी १० ते १५ दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास हा कालावधी आणखी वाढेल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. यामुळे केवळ छाटणीचे वेळापत्रकच नव्हे, तर द्राक्ष उत्पादनावरही गंभीर परिणाम होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वाफसा नसल्याने छाटणी रखडली द्राक्ष बागायतदार सहसा हवामान अंदाजानुसार टप्प्या-टप्याने छाटणीचे नियोजन करतात. मात्र, यावर्षी सततच्या पावसाने बागांमध्ये चिखल झाला आहे. छाटणीपूर्व तयारीसाठी आवश्यक असलेले खत आणि तण व्यवस्थापन सध्या करता येत नाहीये. यासाठी किमान १० ते १५ दिवसांचा वाफसा आवश्यक आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. रोगराई आणि आर्थिक नुकसानीचा धोका चालू वर्षी जून महिन्यापासूनच पावसाने द्राक्ष पट्टयाला झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी झाडांची पाने गळत असून, पानांवर २४ तासांपेक्षा जास्त काळ पाणी राहिल्यास 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर छाटणी करायची की नाही, असा मोठा पेच निर्माण झाला आहे.
- कालावधी लांबला, हंगामही उशिरा
द्राक्ष छाटणीचे तीन महत्त्वाचे टप्पे असतात
आगाप छाटणी : १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर
नियमित छाटणी : १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर
मागास छाटणी : १५ ऑक्टोबरनंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या आगाप छाटणीमुळे डिसेंबर-जानेवारीमध्ये द्राक्षांना चांगला भाव मिळतो. परंतु, यावर्षी ऑगस्टमध्ये फक्त ५ टक्क्यांपर्यंतच छाटण्या झाल्या आहेत. त्यामुळे एरवी डिसेंबरमध्ये सुरू होणारा द्राक्ष हंगाम यंदा किमान एक महिन्यापेक्षा जास्त काळ उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे.