जिल्ह्यातील 12 गोशाळांना अनुदान मंजूर
राज्य सरकारकडून 10 लाख 68 हजाराचा निधी
बेळगाव : गोशाळा म्हणजे निराधार जनावरांसाठी असलेले निवारास्थान होय. येथे जनावरांना ठेवून त्यांची देखभाल करण्यात येते. तसेच पशुसंगोपन, पशुवैद्यकीय विभागासह जिल्हा प्राणी दया संघाच्या माध्यमातून जनावरांची सर्वप्रकारची व्यवस्था करण्यात येते. दरम्यान राज्य सरकारकडून जिल्ह्यात 12 गोशाळांना अनुदान मंजूर करण्यात आले आहे. सरकारकडून 10 लाख 68 हजार 375 रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानातून जनावरांची देखभाल करण्यात येणार असून चाऱ्याचा प्रश्नही उद्भवणार नाही.
जिल्ह्यात 1 हजार 250 गोशाळा असून तेथे 1 हजार 221 जनावरे आहेत. गोशाळेत विविध व्याधींनी ग्रस्त, निराधार जनावरांना ठेवण्यात येते. तेथे जनावरांना कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत, यासाठी राज्य सरकारकडून अनुदान मंजूर करण्यात येते. त्याचबरोबर अनुदानाच्या माध्यमातून जनावरांना चारा, आहार व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते. तसेच जनावरांच्या संरक्षणासाठी उपाययोजना राबविण्यात येतात. काही ठिकाणी पोलीस स्थानकांच्या सुरक्षिततेखाली गोशाळा आहेत.
राज्य सरकारने जिल्ह्यातील 12 गोशाळांना अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये बेळगाव तालुक्यातील मुप्पीन काडसिद्धेश्वर मठ, सेवा समिती शिवापूर, सोमेश्वरमठ गोसेवा संस्था, मुक्तीमठ भुतरामहट्टी, तोटदम्मा कृषी व गोशाळा विकास संघ हुल्मानूर, चिकोडी तालुक्यातील दयोदया जीवरक्षा समिती सदलगा, वीरभद्रदेव काडदेवर मठ यडूर, मल्लिकार्जुनगिरीमर डोंगर मठ, निपाणी तालुक्यातील विरुपाक्षलिंग समाधी मठ निपाणी, हुक्केरी तालुक्यातील निरंजन जगद्गुरु दूरदुंडेश्वर मठ गोशाळा हरगापूर, सौंदत्ती तालुक्यातील गुरु गडदेश्वर लोककल्याण फाऊंडेशन संस्थान मठ चंदरगी, गोकाक तालुक्यातील सुंद्राबाई भगवानजी राठोड जीव मैत्रीधाम योगीकोळ, बैलहोंगल तालुक्यातील सिद्धबसव गोमाता संवा संघ हण्णीकेरी येथील गोशाळांना अनुदान मंजूर झाले आहे.
राज्य सरकारने 10 लाख 68 हजार 375 रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. यामध्ये सर्वाधिक सदलगा गोशाळेला 1 लाख 72 हजार 375 तर यानंतर बेळगाव तालुक्यातील हुल्मानूर येथील गोशाळेला 1 लाख 63 हजार 625 रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. ज्या गोशाळांना अनुदान मंजूर झाले आहे, त्या गोशाळांनी जनावरांच्या देखभालीसाठी अनुदान खर्च करणे आवश्यक असून संबंधित विभागाच्या सूचनेनुसार अनुदान खर्च करण्यात येणार आहे.